लग्न एकदाच होतं, प्रत्येक ॲनिव्हर्सरीला सर्टिफीकेट दाखवावं लागत नाही, असे वक्तव्य उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांनी केले आहे. राज्यात सध्या शिवसेना आमदार अपात्रतेचा मुद्दा चांगलाच चर्चेत असून १० जानेवारी रोजी विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर यांनी याप्रकरणी निकाल दिला. या निकालाविरोधात उद्धव ठाकरेंनी रविवारी पत्रकार परिषद घेतली. त्यानंतर सोमवारी सकाळी संजय राऊतांनी माध्यमांशी संवाद साधला.
संजय राऊत म्हणाले की, “लग्न एकदाच होतं. प्रत्येक ॲनिव्हर्सरीला सर्टिफीकेट दाखवावं लागत नाही. या तारखेला आमचं लग्न झालेलं आहे म्हणून आम्ही ॲनिव्हर्सरी करतोय असं सांगावं लागत नाही. ४० वर्ष लोक अॅनिव्हर्सरी साजरी करत असतात. पक्षाची घटना एकदाच दिलेली असते. मग त्यात जे बदल होतात ते आपण वेळोवेळी कळवत असतो. शिवसेनेनं वेळोवेळी झालेले बदल कसे कळवले आणि त्याच्या पोचपावत्या रविवारी दाखवल्या,” असेही ते म्हणाले.
















