तात्यासाहेब आर.ओ.पाटील म्हणजे एक व्यक्ती नसून ते एक विद्यापीठ होते. तात्यासाहेबांनी इथल्या शेतकऱ्यांना नवा हुंकार दिला. त्यांनी काळ्या मातीला नवा अर्थ दिला. त्यांनी भारतीय शेतीला जैविक युगाचा मंत्र दिला. त्यांनी कृषी विश्वाला समृध्दीचा निर्मल विचार दिला. त्यांचे अतुलनीय योगदान आणि विचार हे शेतीच्या जगताचे दस्ताऐवज आहे. म्हणूनच तात्यासाहेब हे एक व्यक्ती नसून ते नावीन्यपूर्ण विचारांचं विद्यापीठ होतं.
त्यांच्या कर्तृत्वाचं क्षेत्र कृषी, समाजकारण, राजकारण आणि शिक्षण क्षेत्र होतं. तात्यासाहेबांनी आयुष्यभर शेतीची, शेतकऱ्यांची व समाजाच्या विकासाचीच आराधना केली. अन्यायाविरुध्द लढण्यासाठी, यशाच्या शिखरावर पोहचण्यासाठी जे झपाटलेपण लागतं त्याचा मूर्तिमंत आविष्कार म्हणजे तात्यासाहेब आर.ओ.पाटील होते. त्यांचे विचार आणि भाषणे ही कृषी प्रधान देशाविषयीच्या प्रेमाने ओतप्रोत भरलेली असायची, सर्वसामान्य शेतकऱ्यांचे हीत व आधुनिक शेती या विषयीची कळकळ त्यांच्या प्रत्येक शब्दातून आणि कृतीतून व्यक्त व्हायची. त्यांनी शेतीचा नवा विचार मांडला. शेतकऱ्यांच्या कष्टाला अर्थ दिला. त्यामुळे असंख्य शेतकऱ्यांची प्रगती झाली.
तात्यासाहेब हे कृषी पंढरीच्या वाळवंटामधले महान तपस्वी होते. कृषी जगताने त्यांचा अनेक पुरस्कारांनी सन्मान केला. तसेच त्यांचा राष्ट्रीयरत्न पुरस्काराने यथोचित गौरव ही केला आहे. अशा समृध्द विचारांचं हे बीज पुढच्या पिढीतही ते रुजलं आहे. काम करण्याची त्यांची हातोटी, विचार गर्भता, नवनिर्माणाची प्रचंड क्षमता इत्यादी ही सर्व गुणसंपदा त्यांच्या लेकीमध्ये आली आहे. त्यांची लेक म्हणजे सौ. वैशालीताई सुर्यवंशी ! महावृक्षाची ही पारंबी….समृध्द विचारांचा समृध्द वारसा ताईंना मिळाला आहे. वडिलांच्याच पाऊलावर पाऊल टाकत नवनिर्माणाच्या दिशेने ताईंचा प्रवास सुरु आहे. तात्यासाहेब नावाचा महावृक्ष आता पारंबीच्या रुपातून आकार घेत आहे.
नवी उर्मी, माणुसकी आणि विनयशीलतेचा संगम, नवा आत्मविश्वास देणारं, स्वप्नपूर्तीची दुर्दम्य इच्छाशक्ती जागृत करणारं तरुण पिढीचं नव नेतृत्व म्हणजेच तात्यासाहेबांची कन्या सौ. वैशालीताई सुर्यवंशी !
श्रध्देय तात्यासाहेबांचा हा राजकीय सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील वारसा ताईंनी मोठ्या ताकदीने पुढे चालू ठेवला आहे. वडिलांच्या निधनानंतर दु:खाला कवटाळण्यापेक्षा संघर्ष होऊन जगावे आणि वडिलांचे अपूर्ण राहिलेले स्वप्न पुर्ण करावे. यासाठी त्यांनी निर्मल सिडस् कंपनीमध्ये संचालक म्हणून पदभार स्वीकारला. कामाप्रती पूर्ण समर्पण आणि ध्यास घेऊन 16 तास काम करणे आणि आव्हानांना न जुमानता वाटचाल करणे यामुळे वैशालीताई एक यशस्वी महिला उद्योजिका ठरल्यात.त्या केवळ बिझनेस वुमन म्हणूनच परिचित नाहीत तर त्या सामान्य महिलांसाठी देखील आदर्श व प्रेरणादायी ठरल्या आहेत. दृढ इच्छाशक्ती असणाऱ्या वैशालीताई एक कर्तव्यदक्ष महिला असून त्या भारतभर पसरलेल्या निर्मल उद्योग समुहाच्या संचालिका आहेत. औद्योगिक क्षेत्रामध्ये संचालक पदावर राहून एका मोठ्या उद्योग समुहाचं नेतृत्व करणं ही गोष्ट तर मोठी आहेच. शिवाय भारतीय महिलांसाठी त्या एक वैशिष्टयपूर्ण उदाहरण आहेत. त्या विनम्र आणि सौम्य जरी असल्या तरीसुध्दा त्यांच्यामध्ये कार्पोरेट, सामाजिक व राजकीय नेतृत्व करण्याची आणि परिणाम साधण्याची अदम्य क्षमता आहे. त्यांच्यामध्ये नवनिर्माणाची प्रचंड ताकद आहे. त्या नेहमी सांगत असतात की एखादी गोष्ट करण्यासाठी अनेक पध्दती, मतभिन्नता असू शकते. पण नीतिमूल्यांच्या बाबतीत नैतिकतेला पर्याय नसतो.
वैशालीताईंचा राजकारणातील प्रवेश अगदी अपघातानेच झाला. घरात समृध्द राजकारणाचा वारसा असूनही ताईंना कोणतीही राजकीय महत्वाकांक्षा, अभिरुची नव्हती. पण तात्यासाहेब अनपेक्षीतरीत्या गेल्यानंतर निर्माण झालेल्या पोकळीमुळे एका वळणावर ताईंची राजकीय भूमिकेशी गाठ पडली आणि मग अपरिहार्यतेतून ताई राजकारणात आल्यात. राजकारणात आल्यामुळे पाचोरा, भडगाव तालुक्यातील शिवसैनिक, पदाधिकारी व कार्यकर्त्याच्या उत्साहाला उधाण आले. सर्व लोकं ताईंमध्ये तात्यासाहेबांचे रुप शोधतात. तात्यासाहेबांप्रमाणेच ताईंनी कोणत्याही चाकोरीबध्द जगण्याला नकार देत स्वत:चा अवकाश शोधत आणि ते विस्तारत जगण्याचा धाडसी प्रयत्न सुरु केला आहे. संपूर्ण पाचोरा-भडगाव मतदार संघ पिंजुन काढत आहेत. ग्रामोध्दाराच्या नव्या कल्पनांची दिशा त्यांना गवसली आहे. त्यांचा लोकसंग्रह दिवसेंदिवस वाढत आहे. लोकं त्यांना स्वीकारीत आहेत. तात्यासाहेबांच्या स्वप्नांना आकार देण्यासाठी त्या सतत झटत आहेत. तात्यासाहेबांच्या संकल्पनेनुसार पाचोरा भडगाव तालुका सुजलाम सुफलाम व्हावा हे स्वप्न साकार करण्यासाठी त्या अतिशय मनापासून झटत आहेत.
तात्यासाहेब गेल्यानंतर कोणाचाही आधार नसतांना, जनांच्या विकासासाठी, शेतकऱ्यांच्या समृध्दीसाठी ताईंनी स्वप्नाला स्वप्न जोडत दिव्यस्वप्न तयार केलं आणि ते प्रत्यक्षात उतरविण्यासाठी त्यानी धाडसी प्रवासाला सुरुवात केली. येतील ती आव्हाने वरदान म्हणून झेलत, पेलत, काटेरी वाट तुडवत आणि माणसांचं माणुसपण काळजात साठवत कुठही न थांबता त्यांचा प्रवास अविरतपणे सुरुच आहे.
श्रध्देय तात्यासाहेबांच्या पावलावर पाऊल ठेवत ताईंनी सामाजिक कार्याचा घेतलेला वसा पुढे अखंडपणे चालू ठेवला आहे. गोरगरीबांची सेवा म्हणून ताईंनी स्वखर्चाने विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात मोतीबिंदू शिबिरांचे आयोजन करुन शस्त्रक्रिया करुन असंख्यांना दृष्टी दिली. लोकांच्या सदृढ आरोग्यासाठी भव्य योगासन व प्राणायम शिबिरे घेतले. महिलांच्या सशक्ती करणासाठी ताईंनी “नारीशक्तीचा जागर” या उपक्रमातुन स्त्रीशक्तीला बळकट करण्याचा प्रयत्न केला आहे आणि अजुनही करीत आहे. पत्रकारांना घडविण्यासाठी, त्यांच्या बातमीची गुणवत्ता वाढविण्यासाठी ताईंनी समस्त पत्रकारांसाठी ‘पत्रकारिता कार्यशाळा’ आयोजित करुन पत्रकारांच्या शब्दांचे सामर्थ्य वाढविले आहे.तरुण पिढीवर संस्कार करण्यासाठी तरुण व पालकांसाठी प्रबोधनात्मक व्याख्यानांचे आयोजन करुन तरुणांचा आत्मविश्वास जागवला. विविध मिडिया व पत्रकारांना स्वतंत्रपणे बसण्यासाठी व बातम्या लिहीण्यासाठी ताईंनी स्वखर्चाने “स्व. बाळासाहेब ठाकरे मिडिया कक्ष” उभारुन पत्रकारांचा सन्मान केला. तसेच स्पर्धा परिक्षेची तयारी करणाऱ्या शहरी व ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका हे नवे दालन उभे केले.
निसर्गाच्या संवर्धनासाठी पाचोरा भडगाव तालुक्यामध्ये सुमारे 5 हजार झाडे लावण्याचा संकल्प करुन ताईंनी स्वखर्चाने शहरासह तालुक्यात झाडे लावली. त्याचबरोबर रक्तादान शिबिरे, गरिबांसाठी अन्नदान व वस्त्रदान तसेच सुलतानी व अस्मानी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना न्याय मिळून देण्यासाठी केंद्र व राज्य सरकारच्या शेतकरी विरोधी निर्णयाच्या निषेधार्थ ताईंनी धरणे आंदोलन सुध्दा केलीत. पाचोरा-भडगाव तालुक्यामध्ये डेंग्यू व मलेरियाच्या साथीने थैमान घातले असतांना ताईंनी जनतेच्या आरोग्याची काळजी घेत स्व:खर्चाने शहरात व ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात महागडी डास नियंत्रण फवारणी करुन लोकांना आधार दिला. अशा प्रकारे ताईंचे सामाजिक कार्य अखंडपणे सुरूच आहे.
ताईचं नेतृत्व प्रेमळ आणि सर्जनशील आहे. सर्जनशील वृत्ती ही नाविण्याचा व आधुनिक असण्याचा भाग असतो आणि उद्योगामध्ये सर्जनशीलता हा बिझीनेस एक्सलन्सचा गाभा असतो. त्या आग्रही आहेत. स्पष्टवक्त्या आहेत. त्या बोलतात, ऐकुन घेतात आणि संवाद साधतात. नैतिक योग्यतेची शक्तिशाली जाणीव त्यांच्या नेतृत्वाच्या केंद्रस्थानी आहे. विश्वास, विश्वासार्हता आणि सेवा ह्या तात्यासाहेबांच्या मूल्यांशी सदैव बांधील असणाऱ्या ताई मूल्यांच्या विश्वात उंच ठरतात. तात्यासाहेबांनी लाच घेऊन किंवा देऊन स्वत:ची अप्रतिष्ठा केली नाही. तात्यांची भ्रष्टाचाराबाबत निष्कलंकाची प्रतिमा होती. तेच गुण ताईंमध्ये आहेत. लोकांविषयी असलेली तात्यासाहेबांची बांधिलकी ताईंनी आणखी खोलवर नेली आणि तिला बळ दिले. हाच ताईंचा द्रष्टेपणा आहे.
सगळ्या गोष्टी ‘विश्वास’ या शब्दातच सामावलेल्या आहेत. अनेकांच्या तो उक्तीत असतो पण कृतीत नसतो. तात्यासाहेबांच्या तो रक्तातच होता. तात्यासाहेब ‘निर्मल’ मूल्यांचे जनक होते. विश्वास आणि समाजाची सेवा या आदर्शावर त्यांची दृढ श्रध्दा होती. शब्द देणे आणि दिल्या शब्दाला जागणे हा त्यांचा स्वभाव होता. याच गुणांचा संचय ताईमध्ये आहे म्हणूनच त्या खऱ्या वारसदार आहेत. ताईसाहेबांचं जनसेवेचं स्वप्न पुर्ण होवो या शुभचिंतनासह वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.