भुसावळ : भुसावळ व विभागातून दिवाळी सुटीनंतर पुण्याकडे जाणार्या प्रवाशांचे प्रमाण अधिक असते. रेल्वेचे रीझर्वेशन दोन महिने पूर्वीच होत असल्याने या काळात प्रवाशांना बस व खासगी लक्झरीचा पर्याय असतो. सध्या खासगी लक्झरी बसेसचे पुण्याचे भाडे 2200 रुपयांपर्यंत पोहोचले आहे. यामुळे बसच्या प्रवासाला पसंती दिली जाते.
दिवाळीच्या सुटीनंतर परतीच्या प्रवासामुळे प्रवाशांची संख्या वाढली आहे. शहरातून पुण्याकडे जाणार्या सर्व बसेसचे ऑनलाइन रीझर्वेशन फुल्ल झाल्याने आता शहरातून 26 नोव्हेंबरपर्यंत दररोज पुण्यासाठी दोन जादा बसेस सोडण्यात येत आहेत. या दोन्ही बसेससाठी प्रवाशांना बसस्थानकातील आरक्षण खिडकीवरुन मॅन्युअल पध्दतीने रिझर्वेशन करता येईल. या दोन्ही गाड्यांना ऑनलाइन रीझर्वेशनची सुविधा बंद करण्यात आली आहे. बसचे आरक्षण हे आरक्षण काऊंटर भुसावळ बस स्थानकावर सुरू आहे.
भुसावळ आगारातून पुणे येथे जाण्यासाठी दररोज पाच बसेस आहेत मात्र दिवाळीच्या दरम्यानच परतीच्या प्रवासासाठी या पाचही बसचे 26 नोव्हेंबरपर्यंतचे आरक्षण फुल्ल झाले आहे. यामुळे आगार व्यवस्थापक राकेश शिवदे यांनी 26 नोव्हेंबरपर्यंत भुसावळ आगारातून दररोज सायंकाळी साडेपाच व साडेसहा वाजता दोन जादा बसेस सोडण्याचा निर्णय घेतला आहे.