मुंबई । राजकणारात कधी काय होईल याचा नेम नाही. दरम्यान, राज्यात मोठ्या राजकीय उलथापालथीनंतर आता पुन्हा एकदा आणखी एका राजकीय भूकंपाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. राष्ट्रवादीचे दिग्गज नेतेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटात जाणार असल्याची चर्चा आहे.
गेल्या महिन्यात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली. त्यावेळी विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी शिंदे फडणवीस सरकारला पाठिंबा देत उपमुख्यमंत्री पदाची, तर अन्य नऊ जणांनी मंत्री म्हणून शपथ घेतली. एक मंत्रिपद रिक्त ठेवण्यात आले आहे. ते या गटाला मिळण्याची शक्यता आहे. एका दिग्गज नेत्याचा यावेळी प्रवेश होणार असल्याचे भाकीत राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे.
सांगली जिल्ह्यात राष्ट्रवादी पक्ष फुटीनंतरही प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह आमदार मानसिंगराव नाईक, आमदार सुमन पाटील, आमदार अरुण लाड हे मूळ पक्षासोबत राहिलेत.
मात्र, नव्या होणाऱ्या भूकंपात यापैकी काहीजण अजितदादा गटात सामील होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यामध्ये आमदार मानसिंगराव नाईक यांच्या नावाची चर्चा आहे. दरम्यान, विविध समाज माध्यमांसह काही वृत्तवाहिन्यांनीही राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हेही जाणार असल्याचा सूर व्यक्त केला. याबाबत जिल्हाध्यक्ष संजय बजाज यांच्याशी संपर्क साधला असता, अशा कोणत्याही घडामोडी सध्यातरी नाहीत, असे त्यांनी स्पष्ट केले.