मुंबई : राज्यातील शिंदे -फडणवीस सरकारला एक वर्ष पूर्ण झालं असून अद्यापही राज्य मंत्रिमंडळ विस्तार झाला नाहीय. यावरून विरोधकांकडून सरकारला घेरले जात असून त्यात सरकारमध्ये असलेलं अनेक आमदार प्रतीक्षेत आहेत. अशातच आता राज्य मंत्रिमंडळ विस्ताराला वेग आला असून दोन दिवसापूर्वी तर शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी येत्या आठ दिवसात मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याचं सांगून टाकल्याने मंत्रिमंडळाचा विस्तार कधीही होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
आता नव्या विस्तारात महिलांचा समावेश केला जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. तीन महिला आमदारांपैकी एक किंवा दोनजणींचा नव्या विस्तारात समावेश होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. देवयानी फरांदे, सीमा हिरे आणि माधुरी मिसाळ यापैकी एक किंवा दोनजणींना संधी मिळण्याची शक्यता आहे.
त्यातही देवयानी फरांदे या मंत्री होण्याची शक्यता अधिक आहे. फरांदे या ज्येष्ठ आमदार आहेत. शिवाय नाशिकमध्ये महापालिकेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. या पार्श्वभूमीवर देवयांनी फरांदे यांना मंत्रीपदाची लॉटरी लागण्याची शक्यता अधिक वर्तवली जात आहे.
दरम्यान, आज भाजपच्या कोअर कमिटीची बैठक होणार आहे. या बैठकीत राज्य मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा होण्याची शक्यता आहे. या विस्तारात कुणाकुणाचा समावेश करायचा यावर बैठकीत चर्चा होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. भाजपकडून यावेळी नव्या चेहऱ्यांना संधी देण्याची शक्यता अधिक आहे. गोपीनाथ पडळकर यांची मंत्रिमंडळात समावेश होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आमदार रवी राणा यांना संधी मिळते की नाही याकडेही सर्वांचं लक्ष लागलं आहे. तर लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रासप नेते महादेव जानकर आणि रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांचाही समावेश होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.