मुंबई : पावसाची आतुरतेने वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एक मोठी बातमी आहे. अनेक दिवसाच्या प्रतीक्षेनंतर अखेर २३ जूनपासून राज्यात मान्सून सक्रीय होणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज खरा ठरला.
विदर्भात मान्सूनचे आगमन झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. विदर्भातील चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्हा मान्सूनने व्यापला आहे. पुढील ६० तासांत संपूर्ण विदर्भात मान्सून पोहचणार आहे
२५ ते २८ जून विदर्भाच्या बऱ्याच भागात मुसळधार पावसाचा अंदाज नागपूर हवामान विभागाने वर्तवला आहे. बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने मान्सून वाटचाल जोरात सुरु झाली आहे. काल पडलेल्या पावसामुळे नागपूर, वर्धा, चंद्रपूर जिल्ह्यात शेतकरी शेतीच्या कामाला लागला आहे. परंतु जमिनीत पुरेशी ओल झाल्याशिवाय पेरणी करु नये, असे तज्ज्ञांनी सांगितले आहे.
आजपासून मुंबई, नवी मुंबई, ठाण्यात मान्सून सक्रिय झाला आहे. २४ जूनपासून पावसाचा जोर टप्प्याटप्प्याने वाढणार आहे. आता मान्सून पुन्हा सक्रिय होईल, असा अंदाज देखील हवामान विभागाने वर्तवला
जळगावला अलर्ट
राज्यातील इतर भागात देखील पावसाने हजेरी लावली असून बऱ्याच ठिकाणी मुसळधार पाऊस होणार असल्याचा अंदाज आहे. दरम्यान जळगाव जिल्ह्यात शुक्रवारी सायंकाळी ढग दाटून आले होते. काही तालुक्यामध्ये पावसाच्या सरी कोसळल्या. आज जिल्हाला येलो अलर्ट जारी केला आहे.