पुणे : अखेर मान्सूनची प्रतीक्षा अखेर संपली असून आज केरळमध्ये मान्सून दाखल झाला आहे. याबाबत भारतीय हवामान विभागाकडून अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.
एका आठवड्याच्या विलंबानंतर आज केरळात मान्सूनचं आगमन झालेलं आहे. लवकरच मान्सूनचं राज्यात आगमन होईल, असा अंदाज आहे. एरवी मान्सून 1 जून रोजी केरळमध्ये दाखल होते. यंदा मात्र यासाठी 8 तारीख उजाडावी लागली. तळकोकणात 16 जून किंवा त्यानंतरच मान्सून दाखल होईल, असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे.
हवामान खात्यानं गुरूवारी मान्सून केरळमध्ये दाखल झाल्याची अधिकृत घोषणा केली. केरळच्या अनेक भागांमध्ये चांगला पाऊस झाला. मान्सूनच्या आगमनानं गरमीनं हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे. विदर्भाच्या काही जिल्ह्यात पुढच्या तीन ते चार दिवस वादळी वाऱ्यासह यलो अलर्ट देण्यात आला आहे.
भारतीय हवामान विभागाच्या (IMD) एका वरिष्ठ शास्त्रज्ञानं याबाबत माहिती देत सांगितलं आहे की, बिपरजॉय चक्रीवादळ आणि बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे दक्षिण द्वीपकल्पात पाऊस पडेल. तसेच चक्रीवादळ क्षीण झाल्यानंतर दक्षिणेकडील द्वीपकल्पाच्या पलीकडे मान्सूनची पुढील वाटचाल सुरु होईल. केरळमध्ये मान्सून सुरू झाल्यानंतर, 12 जूनच्या सुमारास बिपरजॉय चक्रीवादळ क्षीण होईपर्यंत पाऊस कमी प्रमाणात होईल, असंही त्यांनी सांगितलं आहे.