जळगाव : जळगाव तालुक्यातील किनोद गावाजवळील सावखेडा फाट्याजवळ एकाच दुचाकीने जाणाऱ्या चौघांना भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रॅक्टरने उडविले. यात ज्ञानेश्वर रामराव सपकाळे (वय-४१) रा. फुपणी ता.जि.जळगाव यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज मंगळवारी दुपारी घडलीय. तर या अपघातात इतर तिघे गंभीर जखमी झाले असून त्यांना जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.
जळगाव तालुक्यातील फुपणी येथील रहिवाशी ज्ञानेश्वर सपकाळे हे मंगळवारी १६ मे रोजी दुपारी १ वाजता आपल्या दुचाकीने जळगाव शहरातील रिंगरोडवरील एका सभागृहात आयोजित नातेवाईकाकडील लग्नाला येत होते. त्यांच्यासोबत त्यांचा मोठा मुलगा डिगंबर ज्ञानेश्वर सपकाळे (वय-१९), त्यांचे मित्र राजेंद्र रामचंद्र सोनवणे (वय.४८) आणि निलेश शांतराम निकम (वय-४५) हे तिन जण सोबत होते.
एकाच दुचाकीने फुफणी येथून निघाल्यानंतर किनोद गावाच्या पुढे सावखेडा फाट्यावर सावखेडाकडून येणाऱ्या एका ट्रॅक्टरने दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात ज्ञानेश्वर सपकाळे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. तर दुचाकीवरील इतर तिघे गंभीर जखमी झाले. मयताच्या पश्चात पत्नी, तीन मुले, आई असा परिवार आहे. या घटनेबाबत पोलीसात नोंद घेण्याचे काम सुरू होते.