मुंबई : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीत खळबळ उडाली आहे. मात्र शरद पवार यांनी ‘लोक माझे सांगती’ या आत्मचरित्रा पुस्तकात लिहिले आहे की, ‘मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरेंचं मंत्रालयात फक्त दोनदा जाणं आमच्या फारसं पचनी पडणारं नव्हतं.’ तसंच, ‘बाळासाहेबांसमवेतची संवादातली सहजता उद्धवशी बोलताना नव्हती’, अशी टिपण्णी देखील त्यांनी या पुस्तकाच्या माध्यमातून केली आहे.
आता यावर आज उद्धव ठाकरेंनी माध्यमांशी संवाद साधताना प्रत्युत्तरात एक मिश्किल टिप्पणी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर तुम्ही शरद पवारांशी संवाद साधला का असा प्रश्न उद्धव ठाकरे यांना विचराण्यात आला होता. त्यावर उत्तर देताना उद्धव ठाकरे म्हणाले, त्यांच्या पक्षात काय करायचं हा निर्णय घेण्याचा त्यांना अधिकार आहे.
दुसरं म्हणजे नेत्यांचा जेवढा कार्यकर्त्यांवर अधिकार असतो, तेवढाच कार्यकर्त्यांचाही नेत्यावर असतो. त्यामुळे सर्वांच्या हिताचा निर्णय ते घेतील असे उद्धव ठाकरे म्हणाले. तसेच मी त्यांना काय सल्ला देणार आणि मी दिलेला सल्ला पचनी नाही पडला तर काय करायचं असं म्हणत उद्धव ठाकरेंनी मिश्किल प्रतिक्रिया दिली.
यावर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, प्रत्येकाला आत्मचरित्र लिहिण्याचा, बोलण्याचा, सांगण्याचा अधिकार असतो. मी मुख्यमंत्री असताना काय केलं हे जगजाहीर आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील प्रत्येक कुटुंबाला मी त्यांच्या कुटुंबातील सदस्य वाटतो. यापेक्षा जास्त यावर बोलणं योग्य नाही असं मला वाटतं अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी दिली आहे.