पाचोरा,(किशोर रायसाकडा)- सर्वोच्च न्यायालयात सध्या निकाल प्रलंबित आहे. हा निकाल आपल्याला न्याय देईल. आपलं सरकार पुन्हा येणार असं म्हणत मी काँग्रेससोबत गेलो असलो तरी हिंदूत्व अजिबात सोडणार नसल्याचे उद्धव ठाकरे यांनी जाहीर सभेला संबोधित करतांना सांगितले आहे.माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज जळगाव जिल्ह्यातील पाचोरा मधील जाहीर सभेत बोलत होते. खेड, मालेगावनंतर ठाकरे यांची शिवसेना नेते आणि मंत्री गुलाबराव पाटील यांच्या बालेकिल्ल्यात आज जाहीर सभा पार पडली.
पुढे बोलतांना उद्धव ठाकरे म्हणाले की,ही विराट सभा पाहून पाकिस्तानही सांगेल की शिवसेना कोणाची आहे. हा संपूर्ण महाराष्ट्र पाहतोय की, एकामागून एक सभांना इतकी गर्दी आहे.तरीही काहींना वाटतं की शिवसेना आपलीच आहे अशा टीका ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटावर केली. जळगाव येथील पाचोरा येथे झालेल्या सभेत बोलत असताना त्यांनी शिंदे गटासह भाजपचा चांगलाच समाचार घेतला.
शिवसेना आमचीच आहे असं मत व्यक्त करत ते म्हणाले की, आमच्या सभांना इतकी गर्दी होत आहे, मात्र आमच्याकडील मोतीबींदू झालेल्या निवडणूक आयोगाला मात्र हे कळत नाही. त्यांचा धृतराष्ट्र झाला असेल. पण हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे हे त्यांनी ओळखले नाही. बाप तो बदल देते हे, उसके साथ चुरा भी देते है, असं म्हणत शिंदे गटाचा ठाकरेंनी समाचार घेतला. त्यांनी धनुष्यबाण चोरलं, बाप देखील चोरला. ही गद्दारांची औलाद आपली असू शकत नाही. ४० गेल्यानं आपल्याला फरक पडत नाही. मात्र १ निष्ठावंत गेल्यानं मात्र फरक पडतो. निवडून देणारे आजही आपल्यासोबत असल्याचे प्रतिपादन ठाकरेंनी यावेळी केले.
या सभेत तुफान जनसागर असल्याचं चित्र पाहायला मिळालं. यावेळी उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटासह भाजपाला लक्ष करताना जोरदार हल्लाबोल केला. “आम्ही दगडे मारून सभा बंद करणारे लोकं आहोत, त्यामुळे आम्हाला चॅलेंज करू नये”, असं थेट आव्हान गुलाबराव पाटील यांनी दिले होते. याला उद्धव ठाकरे यांनी प्रत्तुत्तर दिले.
अशा घुशी खूप पाहिल्या
काही जणांना वाटलं होतं, तेच म्हणजे शिवसेना. आम्ही सभेत घुसणार म्हणे. अशा घुशी खूप पाहिल्या, पण अशा घुशींच्या शेपटीला धरुन त्यांना निवडणुकीत आपटायचं आहे, असं म्हणतं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना नेते आणि मंत्री गुलाबराव पाटील यांच्या दगड घेऊन सभेत घुसणार या आव्हानावर प्रत्युत्तर दिलं.
शेतकरी संकटात असताना सत्ताधारी अयोध्येच्या वाऱ्या
अनाथांच्या नाथा झाल्या असतील तुमच्या वाऱ्या तर या आमच्या बांधावरती’ अशी कविता सादर करत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटावर टीका केली आहे. शेतकरी संकटात असताना सत्ताधारी अयोध्येच्या वाऱ्या करत आहे. तरुण शेतकरी आत्महत्या करत आहेत. पण, सरकारला त्याविषयी काहीही वाटत नसल्याचं ठाकरे म्हणाले. यावेळी 40 गद्दार गेल्याने फरक पडत नाही तर एक निष्ठावंत गेल्याने पडतो असंही ठाकरे यांनी म्हटले. जळगावातील पाचोऱ्यात उद्धव ठाकरे यांनी जाहीर सभेला संबोधन केलं. त्यावेळी ते बोलत होते.
शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बोलत असताना त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारचा चांगलाच समाचार घेतला. कावितांच्या रुपाने त्यांनी सध्य सरकारची स्थिती मांडली. ते म्हणाले, शेतकऱ्याने त्याच्या व्यथेला शब्दांकन करुन टाहो फोडला तर त्याला अटक कराल. झाल्या असतील तुमच्या वाऱ्या तर या आता बांधावरी, तुमचं जरी चाललं असेल ओकेमंदी, पण माझ्या कापसाला भाव कधी? असा सवाल करत शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर लक्ष केंद्रित केले. भाजपसोबत असे असेपर्यंत देशाचे नुकसानच होणार आहे.
शिंदे गटाने ठाकरे गटावर केलेल्या आरोपांना देखील त्यांनी प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले की, मिंधे म्हणतात आमचं सरकार घेणार नाही तर देणारं आहे, काय दिलं तुम्ही? आम्हाला म्हणतात घरी बसून सरकार चालवलं. पण मी घरी बसून जे केलं ते तुम्ही वणवण फिरुन करु शकत नाही. जनेतेला विचारा की, मी तुम्हाला जवळचा वाटतो की मिंधे जवळचा वाटतो.
आपण सगळ्या थापा ऐकत आलो आणि पुन्हा अब की बार, अब की बार बस झालं आता आपटी बार करा यांना. सत्यपाल मलिक यांनी माहिती सांगितली. पुलवामा हत्याकांडात आपले ४० जवान शहीद झाले. सुरक्षा विभागाने हलगर्जीपणा केला. भ्रष्टाचााराचा खुलासा केला, पण त्यांच्याविरोधात चौकशीचा ससेमिरा लावला. अमित शाह म्हणाले, सत्यपाल मलिक आज बोलले, राज्यपाल असताना का नाही बोलले? तेव्हा सत्यपाल मलिक यांनी स्पष्ट सांगितलं की, मी पंतप्रधान मोदी यांना जेव्हा सांगितलं तेव्हा ते रील कार्पेटमध्ये होते. त्यांनी सांगितलं की या विषयी काही बोलले नाहीत.
अमित शाह यांना प्रश्न विचारायचा आहे, तुम्ही विरोधकांच्या मागे ईडी, सीबीआय लावले आहे, तुरुंगात जाता की भाजपात येता? तुमच्यामध्ये आल्यानंतर ते शुद्ध होतील आणि आमच्यात राहिल्यावर भ्रष्ट कसे? मला अमित शहा यांना विचारायचं आहे की, तुम्ही विरोधकांवर कारवाई करता, तुमच्या पक्षात आल्यावर मात्र सौम्यपणा घेता. असा सवाल ठाकरेंनी केला. पंतप्रधान यांचा २ नंबरचा मित्र श्रीमंत कसा झाला? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.