अमळनेर, (प्रतिनिधी) : अमळनेर शहरात गुरुवार दिनांक ३० रोजी सकाळी दोन गटात किरकोळ कारणावरून झालेल्या भांडणाचे रूपांतर रात्री दगडफेकीत झाले. रात्री १० च्या सुमारास शहरात ४ ठिकाणी दगडफेक करण्यात आली. यात दोन पोलिससुद्धा जखमी झाले आहेत.
शहरातील ‘या’ भागात दगडफेक…
शहरातील भोईवाडा, मण्यार मोहल्ला, कासार गल्ली, दारू मोहल्ला भागात दोन गटात दगडफेक झाली असून दोन्ही गटातील सामाजिक कार्यकर्त्यांनी आवाहन केल्यावर तणावपूर्ण शांतता पसरली आहे.
पोलिसांना नियंत्रण मिळवण्यात यश…
शहरातील दगडफेक झालेल्या भागात तातडीने डीवायएसपी राकेश जाधव, पोलिस निरीक्षक विजय शिंदे, पोलिस उपनिरीक्षक अनिल भुसारे यांच्यासह पोलिस पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी लागलीच परिस्थितीवर नियंत्रण मिळवले.
छत्रपती संभाजीनगर येथील जाळपोळ प्रकरणी चारशे ते पाचशे जणांवर गुन्हा दाखल
छत्रपती संभाजीनगर येथील राम मंदिराच्या परिसरात बुधवारी मध्यरात्री झालेल्या जाळपोळीच्या घटनेत पोलिस दलाची १५ आणि खासगी ३ वाहने खाक झाली असून या प्रकरणी चारशे ते पाचशे जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रामनवमी शांततेत….
पाेलिसांनी रात्रीच परिस्थिती नियंत्रणात आणत महानगरपालिकेच्या मदतीने रस्त्यावर जाळलेली वाहने व रस्त्यावरील दगडांचा खच उचलून पाण्याने रस्ता धूत स्वच्छ केले. त्यामुळे सकाळी मंदिरात दर्शनास येणाऱ्या भाविकांना जाळपोळीच्या खाणाखुणाही देखील दिसल्या नाहीत.राम मंदिरात गुरुवारी सकाळीच दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या. या घटनेनंतर रामनवमी शांततेत पार पडली.