नवी दिल्ली : वाढत्या महागाईमुळे चिंतेत असलेल्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने रेपो दरात 0.35 टक्के वाढ केली आहे. यामुळे रेपो दर 5.90 टक्के वरून 6.25 टक्के झाला आहे. म्हणजेच होम लोनपासून ते ऑटो आणि पर्सनल लोनपर्यंत सर्व काही महाग होईल आणि तुम्हाला जास्त EMI भरावा लागेल.
व्याजदरांबाबत निर्णय घेण्यासाठी 5 डिसेंबरपासून चलनविषयक धोरण समितीची बैठक सुरू होती. RBI गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी व्याजदराशी संबंधित घोषणा केली. यापूर्वी सप्टेंबरमध्ये झालेल्या बैठकीत व्याजदर 5.40 टक्के वरून 5.90 टक्के करण्यात आले होते. चलनविषयक धोरणाची बैठक दर दोन महिन्यांनी होते. या आर्थिक वर्षाची पहिली बैठक एप्रिलमध्ये झाली. त्यानंतर RBI ने रेपो रेट 4 टक्के वर स्थिर ठेवला. पण RBI ने 2 आणि 3 मे रोजी तातडीची बैठक बोलावून रेपो दर 0.40 टक्क्यांनी 4.40 टक्के ने वाढवला होता.
आतापर्यंत रेपोरेटमध्ये इतकी झाली वाढ
रिझर्व्ह बँकेने रेपो दरात वाढ करण्याची प्रक्रिया मे 2022 पासून सुरू केली होती. त्यानंतर रेपो दरात 0.40 टक्के वाढ करण्यात आली. पुढील महिन्यात, जूनमध्ये, आरबीआयने पुन्हा व्याजदर 0.50 टक्क्यांनी वाढवले. हा कल कायम राहिला आणि ऑगस्ट महिन्यात 0.50 टक्क्यांची वाढ दिसून आली, तर सप्टेंबरमध्येही सेंट्रल बँकेने पॉलिसी रेट 0.50 टक्क्यांनी वाढवले. आता ही पाचवी वेळ आहे, जेव्हा मध्यवर्ती बँकेने लोकांच्या खिशावर भार वाढवला आहे.
यामुळं कर्जाच्या हफ्त्यात वाढ होणार
रेपो रेट हा दर आहे ज्यावर आरबीआय बँकांना कर्ज देते, तर रिव्हर्स रेपो दर हा दर आहे ज्यावर आरबीआय पैसे ठेवण्यासाठी बँकांना व्याज देते. रेपो रेट कमी झाल्यामुळे कर्जाचा ईएमआय कमी होतो, तर रेपो रेट वाढल्याने सर्व प्रकारची कर्जे महाग होतात आणि या क्रमाने ईएमआयमध्येही वाढ होते.