जळगाव: आजकाल ऑनलाइन पेमेंटचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. किराणा माल असो वा भाजीची खरेदी किंवा एखादे बील भरायचे असो… पेमेंट ॲपच्या माध्यमातून तुम्ही सहज शॉपिंग करु शकता. घराबाहेर पडताना खिशात पैसे नसले तरी यूपीआयव्दारे कोठेही व्यवहार करु शकता. UPI Paymentsच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे फसवणुकीच्या घटनांमध्येही वाढ होत आहे. त्यामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी खबरदारी घेणे आवश्यक आहे.
ऑनलाइन फसवणुकीचा एक सर्वात मोठा मार्ग म्हणजे ओटीपी. पैसे पाठवण्याचे आमिष दाखवून अनेकदा ओटीपी मागितला जातो. अशावेळी ओटीपी देणे टाळावे. एखाद्या अनोळखी क्रमांकावरून अनोळखी व्यक्ती तुमच्याशी संपर्क करू पाहात असेल तर त्यापासून दूर राहावे. खाद्यपदार्थ मागवताना किंवा कोणतीही वस्तू मागवण्यासाठी संपर्क क्रमांक शोधत असाल तर गुगल किंवा सोशल मिडीयावरील फोन क्रमांकावर शक्यतो विश्वास ठेवू नये.
बोगस ॲपपासून सावधान
काहीवेळा यूपीआय पेमेंट ॲपची नक्कल असलेली बनावट ॲप उपलब्ध असतात. यांद्वारे ते ॲप वापरणाऱ्याची वैयक्तिक माहिती गोळा करून तिचा गैरवापर होऊ शकतो. हे बनावट ॲप खऱ्या ॲपप्रमाणेच दिसतात व डाऊनलोडसाठी सहज उपलब्ध असतात. Modi BHIM, BHIM Modi App, भीम पेमेंट-यूपीआय गाइड, भीम बँकिंग गाइड अशा मिळत्या-जुळत्या नावांवरुन ॲप बनवले जातात. यापासून सावध राहण्याचा सल्ला सिटी बँकेने दिला आहे.
या गोष्टींची काळजी घ्या
– यूपीआय व्यवहार करताना तुमचा PIN महत्वाचा असतो, त्यामुळे कोणत्याही अनोळखी व्यक्तीला आपला यूपीआय PIN सांगू नका.
– Social Media वर अनोळखी व्यक्तींकडून आलेल्या लिंक्स आणि ईमेल्सवर क्लिक करू नका.
– कुठेही संशयास्पद बाब वाटल्यास बँकेला आपली अद्ययावत माहिती कळवत राहा.
– सुरक्षित वाय-फायचाच वापर करा. सार्वजनिक वाय-फायशी कनेक्ट करणे टाळा.
– आपल्या आर्थिक व्यवहारांवर लक्ष ठेवा.