जळगाव :- ‘स्वच्छ भारत अभियान 2. 0’ हे अभियान विविध उपक्रमाद्वारे राबवले जात आहे. हे अभियान सवयीचा भाग होण्याची गरज असून गावांमध्ये स्वच्छतेचे सातत्य कायम राहावे, ग्रामस्थांचे आरोग्य सुधारावे यासाठी गावातील प्रत्येक कुटुंबाला स्वच्छतेचे महत्व पटणे यासंदर्भात जनजागृती करण्यासाठी ग्रामस्थांनी सक्रिय पुढाकार घेतल्यास गावाचा विकास अधिक गतीमान होवू शकतो, असे प्रतिपादन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. पाळधी येथे जिल्हास्तरीय स्वच्छ भारत अभियान 2. 0 च्या शुभारंभ प्रसंगी बोलत होते, कार्यक्रमच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया हे होते.
जिल्हयाचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते स्वच्छ भारत अभियान २.० चे पोस्टर लॉन्च करण्यात आले. या प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते मार्केट परिसरात स्वच्छता करण्यात आली. पालकमंत्री गुलाबराव पाटील , जि. प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया आणि इतर मान्यवरांच्या हस्ते कचरा कुंडीचे लोकार्पण करण्यात आले.
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले की, स्वच्छ भारत अभियान टप्पा २ या महाभियानात , २०० गावात स्वच्छ भारत ही मोहीम राबवली जाणार आहे. पर्यावरणाच्या दृष्टीने प्लास्टिक प्रतिबंध करावा तसेच ‘गाव स्वच्छ तर जिल्हा स्वच्छ आणि जिल्हा स्वच्छ तर देश स्वच्छ’ असा संदेश त्यांनी दिला. सार्वजनिक स्वच्छ्ता ही लोकांच्या सहभागातून घडणारी क्रांती आहे. प्रत्येकाने आपले कर्तव्य म्हणून स्वच्छ्ता पाळावी गाव तसेच राज्य समृद्ध होईल असा संदेश . गुलाबराव पाटील पाटील यांनी दिला.
नेहरु युवा केंद्र जळगाव जिल्हा युवा अधिकारी नरेंद्र डागर यांनी प्रास्ताविक करताना स्वच्छ भारत अभियान २.० ची माहिती देत जिल्हाभरात नेहरु युवा केंद्र स्वयंसेवक आणि युवा मंडळ यांच्या माध्यमाने स्वच्छ भारत 2.0 मोहीम राबवली जाणार असल्याचे सांगितले. सुरुवातीला नेहरू युवा केंद्राच्या स्वयंसेवकांनी पथनाट्य सादर करीत स्वच्छतेविषयी जनजागृती करून प्लास्टिकविषयी दुष्परिणाम बाबत जनजागृती करण्यात आली.
या प्रसंगी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील , माजी पंचायत समिती सभापती मुकुंदराव ननवरे, सरपंच पाळधी बु. चे अलकाबाई प्रकाश पाटील , पाळधी खुर्द चे सरपंच लक्ष्मीबाई शरद कोळी , प्रांताधिकारी विनय गोसावी , तहसीलदार नितीन कुमार देवरे, गटविकास अधिकारी सुशांत पाटील , पाळधी बुद्रुकचे उपसरपंच चंदन कळमकर, , दिलीप बापू पाटील ग्रामविकास अधिकारी दिपक पाठक तसेच परिसरातील सर्व सरपंच लोकप्रतिनिधी जिल्ह्यातील नेहरू युवा केंद्राचे सर्व तालुका समन्वयक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भारत सरकारच्या युवा कार्यक्रम आणि खेळ मंत्रालयांतर्गत नेहरु युवा केंद्र जळगाव आणि जिल्हा परिषद जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने पाळधी येथे स्वच्छ भारत 2.0 अभियानाचे उदघाट्न महाराष्ट्र राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छतामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
अध्यक्षीय भाषणात जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.पंकज आशिया यांनी स्वच्छ भारत टप्पा २ यामध्ये गावागावात एकल वापर प्लास्टिक प्रतिबंध, सुका कचरा, ओला कचरा व्यवस्थापन योग्य ठिकाणी करावे, सार्वजनिक स्वच्छ्ता राखावी, प्लास्टिक प्रतिबंध नियोजन करावे आणि याविषयी जनमानसात जनजागृती करावी करण्याचे आवाहन केले. पालकमंत्री व मान्यवरांच्या हस्ते प्रभाकर सुभाष माळी, राजू बाबुराव जाधव, महेंद्र भास्कर ननवरे, सतीश नारायण पाटील ,भरत विठ्ठल अहिरे, तानू वना भिव, सुरेश पातोडे या सफाई कर्मचाऱ्यांचे स्वागत करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धरणगाव स्वयंसेवक मुकेश भालेराव याने तर आभार प्रदर्शन लेखाकार अजिंक्य गवळी यांनी केले. कार्यक्रमासाठी युवा स्वयंसेवक मनोज पाटील, मुकेश भालेराव, रोहन अवचारे, नेहा पवार, उमेश पाटील, अनिल बाविस्कर पाटील, गौरव वैद्य, सलाउद्दीन पिंजारी, सुष्मिता भालेराव, विकास वाघ यांनी परिश्रम घेतले.