आंतरराष्ट्रीय करुणा क्लबच्या स्नेहसंम्मेलनात अहिंसा प्रचाराचा संकल्प
जळगाव – ”केवळ भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात दिवसेंदिवस शाकाहाराचे महत्व वाढत असून अनेक देशांमधील लोक शाकाहार स्वीकारत आहेत. शाकाहार, अहिंसा या भारताने संपूर्ण जगाला दिलेल्या महत्वाच्या गोष्टी असून संपूर्ण जग आज या गोष्टी स्वीकारत आहेत” असे प्रतिपादन पुणे येथील शाकाहार प्रवर्तक डॉ. के. एम. गंगवाल यांनी केले. आंतरराष्ट्रीय करुणा क्लबच्या स्नेहसंम्मेलनात उपस्थितांना मार्गदर्शन करतांना त्यांनी अहिंसा आणि शाकाहाराचे महत्व विषद केले.
रतनलाल सी. बाफना गो-सेवा अनुसंधान केंद्र अहिंसातीर्थ येथे आंतरराष्ट्रीय करुणा क्लबच्या स्नेहसंम्मेलनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या वेळी जळगाव जिल्ह्यातील विविध शाळांमधील मुख्याध्यापक, शिक्षक, अध्यापकांची उपस्थिती होती. यावेळी काही शिक्षकांचा सन्मान देखील करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात करुणा गीतने करण्यात आली. करुणा क्लबच्या माध्यमातून विविध शाळा व महाविद्यालयांना सोबत घेऊन शाकाहार व अहिंसेचा प्रचार-प्रसार करण्याचा संकल्प करण्यात आला. डॉ. गंगवाल यांनी शाकाहार व अहिंसेचे महत्व विषद करतांना सांगितले की विद्यार्थ्यांमध्ये लहानपणापासूनच करुणा, दया, अहिंसा या मूल्यांचा विकास केला पाहिजे. लहानपणापासूनच त्यांच्या मध्ये शाकाहाराचे संस्कार रुजविले पाहिजे. शाकाहार हा धर्माशी निगडित विषय नसून तो विज्ञानाशी निगडित आहे. पर्यावरणाला व पृथ्वीला वाचविण्यासाठी विद्यार्थी निर्णायक भूमिका बजावू शकतात आणि त्या कामी आंतरराष्ट्रीय करुणा क्लब शाळांच्या व विद्यार्थ्यांच्या माध्यमातून महत्वाची भूमिका बजावीत आहे. आजवर आम्ही गेल्या ५० वर्षात ४० लाख लोकांना शाकाहारी बनविले आहे.
विद्यार्थ्यांना केवळ शाकाहार आणि अहिंसेचे ज्ञान देऊन चालणार नाही तर त्यांच्या आचरणात शाकाहार रुजवावा लागेल, आणि हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा शिक्षक आणि पालक स्वतः शाकाहारी होतील. त्यासाठी विद्यार्थ्यांना शाकाहाराचं महत्व पटवून सांगता आलं पाहिजे. शाकाहार करणे ही काळाची गरज असून याला धार्मिक नव्हे तर वैज्ञानिक कारण आहे. सध्या पर्यावरणाचं संतुलन मानवाच्या चुकांमुळे बिघडले आहे त्यामुळे केव्हाही पाऊस येणे, शहरात बिबट्यांचा संचार वाढणे, चक्री वादळ येणे हे पर्यावरण असंतुलनाचे परिणाम आहेत. पर्यावरण संतुलन सांभाळायचं असेल तर अहिंसा, शाकाहार या गोष्टींचा स्वीकार करून प्राणी हत्या, मांसाहार या गोष्टी बंद केल्या पाहिजेत.
रतनलाल सी. बाफना ( शाकाहार प्रवर्तक, संस्थापक – अहिंसातीर्थ )
मांसाहार हा मानवते वरील कलंक आहे. हा कलंक मिटविण्यासाठी मांसाहार विक्रीवर बंदी आणली पाहिजे. रस्त्यावरील मांस विक्री बंद केली पाहिजे. शाकाहार प्रचार करणे आवश्यक आहे आणि त्यासाठी करुणा क्लबच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये हे संस्कार रुजवावे लागतील. गायी वाचवाव्या लागतील. शिक्षक नवीन पिढी घडवू शकतात. दया, करुणा हे भाव खानपानातून येतात आणि म्हणूनच शाकाहारी होणे आवश्यक आहे.
करुणा क्लबची सुरुवात आम्ही २ शाळेंपासून केली होती. आज २ हजार पेक्षा अधिक शाळा करुणा क्लबशी जुळलेल्या आहेत. लहानपणाचे संस्कार मुलांच्या आयुष्यावर दीर्घकाळ परिणाम करतात. म्हणून करुणा क्लबच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये करुणा, दया, अहिंसा, शाकाहार या गोष्टी रुजविणे आवश्यक आहे.
करुणा क्लबचा प्रचार व प्रसार करण्यासाठी विविध माध्यमिक शाळांमध्ये जावे लागते. बऱ्याचदा शिक्षण विभागाची परवानगी नसल्याने अडथळे येतात. ही समस्या करुणा क्लब जळगाव तर्फे सांगितल्या नंतर जिल्हा शिक्षणाधिकारी श्री. जे. बी. पाटील यांनी करुणा क्लबला माध्यमिक शाळांमध्ये हा उपक्रम राबविण्यासाठी परवानगी देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.
काय आहे करुणा क्लब?
विश्वातील समस्त प्राणी, जीवजंतू, पशु-पक्षी व मनुष्याप्रति प्रेम, वात्सल्य, दया, सहानुभूतीची सदभावना आहे. या करुणेच्या भावनेला विकसित करण्यासाठी विद्यार्थ्यांचा समूह आहे करुणा क्लब. करुणा क्लबच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये नैतिक गुण, सामाजिक दायित्व, बंधू-भाव, मानवता इ, संस्कार रुजविले जातात. राष्ट्रीय स्तरावर करुणा व मानवीय बोध कथांवर आधारित प्रतियोगी परीक्षांचे आयोजन करून दरवर्षी दोन लाख रुपयांपर्यंतचे पुरस्कार वितरित केले जातात.
मान्यवरांची उपस्थिती –
इंटरनॅशनल करुणा क्लबच्या जळगाव येथील स्नेहसंम्मेलनात जळगाव जिल्ह्यातील अनेक माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, अध्यापक या बरोबरच जिल्हा शिक्षण अधिकारी श्री. बी. जे. पाटील, पुणे येथील शाकाहार प्रवर्तक डॉ. के.एम. गंगवाल, अहिंसातीर्थाचे संचालक व शाकाहार प्रवर्तक श्री. रतनलालजी बाफना, चेन्नई करुणा क्लबचे अध्यक्ष श्री. सज्जन सुराणा, शाकाहार प्रवर्तक श्री. कस्तुरचंद बाफना, सुरेशजी कांकरिया हे मान्यवर उपस्थित होते. सूत्र संचालन श्री. अभयसिंगजी व दिनेश पालवे यांनी केले.
अहिंसातीर्थ संस्कार स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन –
कार्यक्रमात जिल्ह्यातील सर्व माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांना ”अहिंसातीर्थ संस्कार स्पर्धा २०१९” मध्ये सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले. शालेय विद्यार्थ्यांसाठी आयोजित या स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांना अहिंसातीर्थावर आधारित सोप्या प्रश्नांची उत्तरे दिल्यानंतर लाखोंची बक्षिसे जिंकण्याची संधी आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी किंवा अधिक माहितीसाठी ९५५२२११०९९ किंवा ९५६१३२१०२९ या क्रमांकांवर संपर्क साधावा.