- आमदार किशोर पाटील दिवाळी मिलन कार्यक्रमात झाले भावुक
पाचोरा -(प्रतिनिधी)अत्यंत चुरशीच्या निवडणुकीत माझा विजय झाला असला तरी त्या विजयाच्या आनंदापेक्षा परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांवर कोसळलेले अस्मानी संकट फार मोठे आहे त्यामुळे निवडणुकीतील विजयाचा कोणताही जल्लोष ,आनंदोत्सव अथवा बॅनरबाजी केली नाही. माझ्यासह शिवसेनेचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते या अस्मानी संकटामुळे दुःखात असून ओला दुष्काळ सदृश्य परिस्थिती असल्याने आता शासनदरबारी मागणी करून शेतकऱ्यांना न्याय व आधार मिळवून देईल .तोच माझ्या विजयाचा खरा आनंद असेल असे अत्यंत भावनिक मत आमदार किशोर पाटील यांनी व्यक्त केले. आपल्या सिंहगड या निवासस्थानी माध्यम प्रतिनिधीं सोबतच्या दिवाळी मिलन कार्यक्रमात ते बोलत होते.
तसेच 1 नोव्हेंबर रोजी वाढदिवसानिमित्त कोणताही कार्यक्रम अथवा बॅनर बाजी न करण्याचे आवाहनही त्यांनी केले. आमदार किशोर पाटील यांनी आपल्या निवासस्थानी पाचोरा व भडगाव तालुक्यातील मीडिया प्रतिनिधीं सोबत दिवाळी मिलन कार्यक्रमाचे आयोजन करून त्यांचे सोबत फराळ व चहा पाणी घेत गप्पा केल्या .या अस्मानी संकटामुळे बळीराजावर ओढवलेले संकट वेदनादायी असल्याची खंत व्यक्त केली. ते म्हणाले की ,पाचोरा व भडगाव तालुक्यात गेल्या महिनाभरापासून पावसाचे सातत्य कायम आहे. पावसामुळे नदी-नाले धरणे ओसांडले आहेत. बहूतांश शेत शिवारात पाणीच पाणी आहे. त्यामुळे कापूस मका या नदी पिकांसह ज्वारी बाजरी उडीद मूग हे खरीप उत्पादन हातचे गेले आहे. मका व कापूस अळीच्या प्रादुर्भावामुळे संपला आहे. कापूस बोंड व मका कणसा तून कोंब बाहेर आले आहेत.
गेल्या चार वर्षांपासून दुष्काळाच्या सावटात असलेल्या शेतकऱ्यांची आर्थिक विवंचना वाढली आहे. बळीराजाला बळ व धीर देण्यासाठी ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडे केल्यानंतर त्यांनी महसूल विभागात पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. परंतु दिवाळी सुट्ट्या मुळे पंचनामे लांबणीवर पडले असून दोन दिवसानंतर पंचनामे करण्याचे काम सुरू होईल व ते प्राधान्याने पूर्ण करून नुकसान भरपाई संदर्भातील प्रस्ताव शासन दरबारी सादर केला जाईल .त्याचा शासनाकडे पाठपुरावा करून बळीराजाला भरपाई मिळवून देण्यासाठी सर्वार्थाने प्रयत्न होतील व ही भरपाई मिळाल्यानंतरच खऱ्या अर्थाने मला माझ्या विजयाचा आनंद होईल असे स्पष्ट केले .शेतकऱ्यांनी आपले पंचनामे संबंधित यंत्रणेकडून करून घ्यावेत. व्यापाऱ्यांनी खरेदी केलेल्या मक्याचे देखील नुकसान झाले असून त्यांच्याही तक्रारी व भरपाईची मागणी प्राप्त झाली असल्याने त्यांनाही न्याय देण्यासाठी प्रयत्न होतील असे स्पष्ट केले.
वाढदिवस साध्या पध्दतीने
अस्मानी संकटामुळे आमदार म्हणून विजयी होण्याचा आनंद साजरा केला नाही तसेच येत्या ता 1 नोव्हेंबर रोजी वाढदिवस असल्याने कोणताही कार्यक्रम अथवा बॅनर बाजी करणार नसल्याचे सांगून पदाधिकारी व कार्यकर्त्यांना देखील त्याबाबत सुचित केले आहे. वाढदिवसानिमित्त निवासस्थानी गळाभेट घेऊन शुभेच्छा स्वीकारू. कोणीही हार, गुच्छ अथवा भेटवस्तू आणू नये असे आवाहनही त्यांनी केले . व आपल्या विजयाचे भागीदार ठरलेल्या मीडिया प्रतिनिधींचे आभार व्यक्त केले. स्वीय सहाय्यक राजेश पाटील यांनी आभार मानले.