पुणे,(प्रतिनिधी)- कोरोनाच्या नव्या ओमायक्रॉन व्हेरिएंटचे पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रात ७ बाधित रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान आळंदी मधील एका तरुणाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आहे मात्र त्या बाधित रुग्णाचे नेमकं निदान झालेले नाही.कोरोनाच्या नव्या ओमायक्रॉन व्हेरिएंटचे आता राज्यात एकूण संख्या ८ इतकी झाली आहे. तर देशातील बाधित रुग्णाची संख्या २१ इतकी झाली आहे.
राज्यात डाेंबिवलीत ओमायक्रॉनचा पहिला बाधित रुग्ण आढळल्या नंतर आता पुणे व पिंपरी-चिंचवडमध्ये ७ जणांना ओमायक्रॉनची बाधा झाल्याचे समोर आले आहे.भारतीय वंशाची महिला २४ नोव्हेंबरला नायजेरियातून पिंपरी-चिंचवड शहरात आली होती. सोबत तिच्या दोन मुलीही होत्या. या तिघींच्या संपर्कात आलेल्या १३ जणांची तपासणी केली असता महिलेचा भाऊ, दोन मुली अशा सहा जणांना लागण झाल्याचे उघड झाले आहे तर पुण्यातील ओमायक्राॅन १ बाधितरुग्ण फिनलँड येथून परतला होता अशी माहिती मिळाली आहे.