पहूरच्या फुले विद्यालयात ‘सायबर क्राईम ‘ वर मार्गदर्शन
पहूर, ता . जामनेर- विद्यार्थ्यांनो , पालकांच्या कष्टाची जाण ठेवत जिवनाचे ध्येय गाठा , सोशल मिडीयाच्या चक्रव्यूहात न अडकता अभ्यासाचे परिपूर्ण नियोजन करून त्याची कार्यवाही करा , यातून हमखास यश प्राप्त होईल, असे प्रतिपादन पहूर पोलीस ठाण्याचे मावळते सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश काळे यांनी केले . ते सावित्रीबाई फुले माध्यमिक विदयालयाच्या स्वामी विवेकानंद व्यवसाय मार्गदर्शन व शालेय समुपदेशन केंद्रातर्फ आयोजित कार्यक्रमात बोलत होते.
प्रारंभी सरस्वती देवीच्या मुर्तीचे पुजन करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहूणे म्हणून महात्मा फुले शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बाबुराव घोंगडे उपस्थित होते . अध्यक्षस्थानी शाळेच्या मुख्याध्यापिका व्ही.व्ही. घोंगडे होत्या . यावेळी शाळेच्या वतीने मान्यवरांचा सत्कार करण्यात आला .सुरूवातीला विदयार्थीनींनी स्वागत गीत सादर केले. पुढे बोलताना श्री. काळे म्हणाले की, शालेय जीवनात घेतलेली मेहनत भावी आयुष्याची शिदोरी असते . पोलीस दलात मुलांसह मुलींनाही विविध संधी असून या संधी प्राप्त करण्यासाठी शारिरीक सुदृढते बरोबरच अभ्यास , सामान्यज्ञान महत्वाचे असते .
सायबर क्राईमचे लोण शहरांसह आता ग्रामीण भागातही पसरत आहे . मुला – मुलींनी मोबाईलचा योग्य वापर करावा , नको त्या पोस्ट व्हायरल करू नयेत , मुलींनी अन्याय सहन न करता वेळीच पालक, शिक्षक , पोलीसांना सांगावे ,असेही त्यांनी सांगीतले . मुख्याध्यापिका श्रीमती घोंगडे अध्यक्षीय मार्गदर्शन करताना म्हणाल्या की , दहावी नंतर विदयार्थ्यानी आपल्या आवडीच्या क्षेत्रात करीयर करावे .
यावेळी गोपनीय विभागाचे जितूसिंग परदेशी , प्रवीण देशमुख,अनिल देवरे, ईश्वर देशमुख आदींची उपस्थिती होती . प्रास्ताविक समुपदेशन केंद्राचे सचिव शंकर भामेरे यांनी केले .आभार के .ए. बनकर यांनी मानले . यशस्वीतेसाठी एम .एच. बारी , ए.ए. पाटील , सी .एच. सागर , आर .जे. चौधरी , आर .डी. सोनवणे , श्रीमती बोदडे , सुनिल पवार , संजय बनसोडे यांच्यासह सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले .