भुसावळ- येथील विधानसभा मतदार संघाच्या यादीमध्ये दुबार, तिबार नावे आहेत. जे या मतदार संघात वास्तव्यास नाहीत अशा मतदार संघा बाहेरील व्यक्तींची नावे सुद्धा या मतदार यादीत असून मयत मतदारांची नावे सुद्धा या यादीत समाविष्ट आहेत. तसेच बऱ्याच ठिकाणी एकाच यादीत एकाच मतदाराची दोन नावे आजू बाजूला आहेत. काही मतदारांच्या नावापुढे अजूनही एपिक क्रमांक छापलेला नाही मग ही सर्व बोगस मतदार नाहीत का? हजारो बोगस नावे या भुसावळ विधानसभा मतदार यादीमध्ये असल्याने बोगस मतदान होण्याची शक्यता आहे. प्रत्येक निवडणुकीत मतदार यादीचा घोळ असतो. बोगस नावे प्रत्येक वेळी आढळत असतात यासंबंधी भुसावळ शिवसेनेतर्फे आज दिनांक २१ सप्टेंबर २०१९ रोजी सकाळी ११ वाजता भुसावळ तहसीलदार दीपक धीवर यांच्याकडे तक्रार करण्यात आली.
अचूक मतदार यादीच निवडणूकीच्या वेळेस वापरावी असे निवेदन देण्यात आले.यावेळी भुसावळ शहर प्रमुख बबलू बऱ्हाटे, वरणगाव शहर प्रमुख रवी सुतार, उपतालुका प्रमुख मनोहर बारसे, शहर संघटक योगेश बागुल, नबी पटेल, उपशहर प्रमुख राकेश खरारे, सुनील भोई, ग्राहक संरक्षण कक्ष शहर प्रमुख मनोज पवार, विनोद गायकवाड, विकास खडके, शरद जैस्वाल, सदानंद वराडे, किशोर शिंदे, अरुण साळुंखे, सुरेंद्र सोनवणे, पवन बाक्से, लोकेश वारके, निखिल वारके, रितेश महाजन, तेजस तिवारी, हर्षल चौधरी उपस्थित होते.
राज्याचे मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे लेखी निवेदन: बबलू बऱ्हाटे
भारतीय लोकशाहीचा पाया अधिक सशक्त करण्यासाठी लोकशाहीचा गाभा असलेल्या मतदार याद्या निर्दोष व अचूक होण्यासाठी, बोगस नावे व दुबार नावे वगळण्यासाठी अत्यन्त प्रभावी उपाय म्हणजे मतदार यादी मध्ये मतदारांचे नाव हे आधार क्रमांकाशी जोडण्यात यावे अशी आग्रही मागणी भुसावळ शिवसेनेतर्फे करण्यात येत आहे यासंबंधी राज्याचे मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे अशी माहिती शिवसेना शहर प्रमुख बबलू बऱ्हाटे यांनी दिली आहे.
मतदार याद्या पारदर्शक असाव्यात
पॅन कार्ड पासून मोबाईल पर्यंत सर्वच यंत्रणा आधारकार्डशी संलग्न करीत आहे. त्याच प्रमाणे लोकशाहीचा मुख्य पाया असलेल्या मतदार यादीतील प्रत्येक मतदाराचे नाव हे आधारकार्डशी संलग्न करणे अत्यन्त आवश्यक आहे.
मतदार याद्या या पारदर्शक असाव्यात व बोगस दुबार नावे येऊ नयेत यासाठी प्रत्येक मतदाराचे नाव मतदार यादीमध्ये समावेश करताना आणि असलेल्या नावांची मतदाराच्या आधार क्रमांकाशी जोडण्यात यावी म्हणजे दुबार नावे आणि मयत नावांचा समावेश होण्याची शक्यता नाही. देशातील बहुतेक सर्वच मतदारांची आधार क्रमांक आलेली असल्याने आधार संलग्न नावे मतदार यादीत करण्याची मोहीम निवडणूक आयोगाने हाती घ्यावी त्याला सर्वच राजकीय पक्ष सहकार्य करतील अशी अपेक्षा शिवसैनिकांनी व्यक्त केली.
मतदार यादी बाबतीत कर्मचारी वर्गाशी बैठक घेऊन योग्य कार्यवाही केली जाईल असे आश्वासन तहसीलदार दीपक धीवर यांनी दिले.