जळगाव : आतंरराष्ट्रीय बाजारपेठेत साेन्याच्या मागणीत माेठ्या प्रमाणात घट आली आहे. त्यामुळे मागील गेल्या दोन दिवसात जळगावच्या सुवर्णनगरी सोने आणि चांदीच्या भावात मोठी घसरण झाली आहे. गेल्या २ दिवसात सोने १३०० रुपयापर्यंत तर चांदीच्या भावात तब्बल ४ हजार रुपयाची घेत झाली आहे.
आज, बुधवारी जळगावात सोन्याचे दर 3 टक्के जीएसटीसह 47 हजार 700 रुपये प्रति तोळा तर चांदीचे दर जीएसटी शिवाय 63 हजार रुपये प्रति किलो आहेत.
जळगावच्या सुवर्ण बाजारात सोमवारी (9 ऑगस्ट) 2 हजार 500 रुपयांची घसरण झालेल्या चांदीच्या भावात सलग दुसऱ्या दिवशी म्हणजेच मंगळवारी पुन्हा 1 हजार 500 रुपयांची घसरण होऊन ती 65 हजार रुपये प्रतिकिलोवर आली. सोने मात्र 47 हजार 400 रुपये प्रति तोळ्यावर स्थिर आहे. सोन्याचे दर सोमवारी 1 हजार 300 रुपयांनी कमी झाले होते.
सोने-चांदीचे दर घसरण्याचं कारण काय?
आंतरराष्ट्रीय पातळीवर औद्योगिक मागणीदेखील कमी झाल्याने हा परिणाम होत असल्याचे जाणकारांकडून सांगितले जात आहे. सोन्याचे दर अजून 1 हजार रुपयांनी घसरू शकतात. चांदीच्या बाबतीत देखील हीच स्थिती आहे. त्यामुळे सोने व चांदीत गुंतवणूक करण्यास इच्छुक असलेल्यांनी आता 30 टक्के इतकी खरेदी करायला हरकत नाही, असे सराफ असोसिएशनचे सचिव स्वरूपकुमार लुंकड यांनी सांगितले.