जळगाव – येथील पोलीस कॉन्स्टेबल विनोद अहिरे यांच्यावर दि. 28 ऑक्टोबर 18 रोजी यांच्यावर अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी जिल्हा पेठ पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र तक्रारदार मुलीच्या आईने काही महिन्यापूर्वी पोलीस अधीक्षकांना लेखीपत्र देऊन आमची तक्रार बलात्कार केल्याची नव्हती तर आमची तक्रार विनोद अहिरे यांच्या मोबाईल वरून आलेल्या मॅसेज विरुद्ध होती असे असतांना आमच्या तक्रारीला गंभीर स्वरूप देऊन बलात्काराची खोटी तक्रार दाखल करून घेतली ती आम्हाला मान्य नसल्याचे म्हटले आहे.यामुळे विनोद अहिरे बलात्कार प्रकरणाला नवीन कलाटणी मिळाली आहे.या तक्रारदार महिलेच्या या पत्रामुळे दाखल करण्यात आलेला बलात्काराचा गुन्हा पोलीस प्रशासनाच्या पूर्वग्रह दूषित भावनेतून तर दाखल झाला नाही असा प्रश्न निर्माण होत आहे.
या बाबत सविस्तर असे की,एका वकिलाने माहितीच्या अधिकारात या प्रकरणात काही माहिती मागितली होती त्यावेळी तक्रारदार मुलीच्या आईने पोलीस अधीक्षकांना दिलेले पत्र प्राप्त झाले.त्यात म्हटले आहे कि, विनोद अहिरे यांच्या मोबाईल वरून आलेल्या मेसेज बद्दल विचारणा करण्यास गेले असता पोलिसांनी मॅसेज ची तक्रार न घेता त्यांना पंधरा दिवस ताटकळत ठेऊन गुन्ह्याला गंभीर स्वरूप दिले व विनोद अहिरे यांच्यावर कठोर कारवाई करता यावी म्हणून फिर्यादी यांची दिशाभूल करून सरळ बलात्काराचा गुन्हा दाखल करून घेतला होता. तशा स्वरूपाचा पुरवणी जबाब देखील संबंधित तक्रारदार मुलीच्या आईने जिल्हापेठ पोलिसांना दिलेला आहे. असे विश्वसनीय सूत्रांकडून समजते. सदरचे प्रकरण हे न्यायप्रविष्ट आहे.या सबबीखाली कोणतीही माहिती पोलिसांनी माध्यमांच्या प्रतिनिधींना दिलेली नाही. विशेष म्हणजे गुन्हा घडल्याच्या दुसऱ्याच दिवशी तत्कालीन पोलीस अधीक्षक दत्ता शिंदे यांनी सदर प्रकरणाबाबत पत्रकार परिषद घेऊन सविस्तर माहिती दिली होती.मात्र आता तक्रारदार मुलीच्या आईचा आलेला अर्ज व पोलीस प्रशासनाने त्यांचीच दिशाभूल केल्याची माहिती पोलीस दडवत आहे म्हणून सदर गुन्ह्याबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. विनोद अहिरे यांनी स्वकर्तुत्वाने जळगाव जिल्हा पोलिस दलात कराटे स्केटिंग च्या माध्यमातून व विविध कार्यक्रमातील आपल्या खुमासदार सूत्रसंचालनाच्या माध्यमातून आपली वेगळी अशी ओळख निर्माण केली होती.दिवसेंदिवस अहिरे यांचे वर्चस्व वाढत असल्यानेच त्यांना या प्रकरणात गोवण्यात आल्याचेही बोलले जात आहे. सदर प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने मे. न्यालयाच्या निकालाची उत्सुकता सर्वांनाच आहे.