अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेला आज १ नोव्हेंबर २०२० रोजी २८ वर्ष पूर्ण होत आहेत. सामाजिक कार्यासाठी लावलेलं हे रोपटे आज वटवृक्षात रूपांतरित झाले असून आज २९ व्या वर्षात पदार्पण करत असतांना मनस्वी आंनद होत आहे.आजच्या सुवर्ण दिवशी ‘समता परिषदेची’ स्थापना करण्यात आली असून वर्धापन दिनानिमित्त तमाम ‘समता’ पदाधिकारी, सदस्यांना वर्धापन दिनाच्या शुभेच्छा मंत्री ना.छगन भुजबळ यांनी ट्विट करुन दिल्या असून यावेळी त्यांनी जुन्या आठवणींना उजाळा देखील दिला आहे.
छगन भुजबळ यांनी ट्विट करुन म्हटलं आहे की, आज या संघटनेला २८ वर्ष पूर्ण होत आहे.समता परिषदेचा पहिला मेळावा ६ जून १९९३ साली जालना येथे झाला.या मेळाव्यात अध्यक्षपदी शरद पवार तर प्रमुख पाहुणे तत्कालीन समाजकल्याण मंत्री सिताराम केसरी,महाराष्ट्रातील तत्कालीन समाज कल्याण मंत्री रामदास आठवले,मंत्री शिवाजीराव शेंडगे,
श्री.मधुकर पिचड यांच्यासह देशातील विविध मान्यवरांसह सुमारे २ लाखांहून अधिक समता सदस्य उपस्थित होते.१९९३ मध्ये जालना येथे झालेल्या या मेळाव्यात मंडल आयोग लागू करण्यात यावा असा ठराव करून १९९४ साली श्री.शरद पवार यांनी मंडल आयोग लागू केला. हे या संघटनेचे पहिले यश असल्याचं सांगत छगन भुजबळांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला.