जळगाव, (प्रतिनिधी)- एकनाथ खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशा दरम्यान भाषणात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी टायगर अभि जिंदा है… पिक्चर अभि बाकी है… अशी डायलॉगबाजी केली असल्याने भाजपचे नाव न घेता इशारा दिला आहे.नाथाभाऊ राष्ट्रवादीसाठी ‘टायगर’ ठरतील असा विश्वास खुद्द राष्ट्रवादी पक्षाचे नेते कबूल करत असल्याने पुढील काळात ‘भाजपातील कोणत्या नेत्याचा पिक्चर’ बनविण्यात येईल…कुणाचा पिक्चर बाकी आहे हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
खडसे म्हणतात भोसरी भूखंड प्रकरणात माझ्यावर खोटे आरोप करून बदनाम केलं… राजकीय आयुष्य बरबाद करण्याचा प्रयत्न स्वपक्षाच्या लोकांनी केल्यानं खूप वेदना झाल्या मात्र येणाऱ्या काळात कोणी किती भूखंड घेतले हे दाखवून देऊ, दोषींवर कारवाई साठी सरकार कडे मागणी करू, पक्षाने फक्त पाठीशी उभं राहावं असं म्हणत खडसे आज गरजले हे मात्र खरं आहे. खडसेंच्या आजच्या भाषणावरून असं दिसत आहे की, पूर्ण तयारीनिशी ते आता मैदानात उतरले आहे. येणाऱ्या काळात नाथाभाऊ काय जादू करतात याबाबत उत्सुकता राहणार आहे.