खळबळजनक ; मोदींनी महाराष्ट्राचा भ्रमनिरास केला… जयंत पाटीलांचे ट्विट… एकनाथ खडसेंनी केलं रिट्विट
जळगाव, (प्रतिनिधी)– पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टिकाश्र करणारं ट्विट राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केलं… आणि तेच रिट्विट भाजपाचे नाराज नेते एकनाथराव खडसे यांनी करून एकप्रकारे जयंत पाटील यांच्या टिकाश्रला पाठिंबा दिल्याने खडसेंनी राष्ट्रवादी प्रवेशाचे सूचक संकेतच दिले आहे असे म्हणावे लागेल.
एकनाथराव खडसेंनी सोशल मीडियाच्या माध्यमातून राष्ट्रवादीच्या नेत्याचे रिट्विट केल्यानं आता खडसे पक्ष सोडतीलच असे बोललं जात आहे.
जयंत पाटील यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे की, आजच्या भाषणात पंतप्रधान काहीतरी नवीन सांगतील, कोरोना व आर्थिक संकटावर मात करण्यासाठी मार्ग देतील, अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना दिलासा देतील असं वाटलं होतं. मात्र यापैकी त्यांनी काहीच केले नाही. महाराष्ट्राचा, देशाचा भ्रमनिरास केला असा आरोप त्यांनी नरेंद्र मोदींवर केला होता, मात्र महत्वाचे म्हणजे एकनाथ खडसेंनी हे ट्विट रिट्विट केलं. त्यामुळे एकनाथ खडसेंचा राष्ट्रवादी प्रवेश लवकरच होईल असं दिसतं.