पाचोरा- येथील गिरणाई शिक्षण संस्था संचलित शिंदे इंटरनॅशनल स्कूलमध्ये १३ ऑगस्ट २०२० रोजी ५१ वृक्षलागवडीचा संकल्प पूर्ण झाला. संस्थेचे अध्यक्ष तात्यासो पंडितराव शिंदे, उपाध्यक्ष नीरज मुणोत, सचिव ऍड जे.डी, काटकर, सहसचिव शिवाजी शिंदे व प्राचार्य व्ही. जी. पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत निंब व बेल पत्राच्या ५१ रोपांची ची लागवड यावेळी करण्यात आली.
जगातील वाढते प्रदूषण व त्याद्वारे पर्यावरणाचा होणारा ऱ्हास याबाबत शालेय विद्यार्थ्यांमध्ये व समाजामध्ये जनजागृती व्हावी या उद्देशाने गिरणाई शिक्षण संस्थेतर्फे दरवर्षी वृक्ष लागवड केली जाते. या संकल्पाचाच एक भाग म्हणून यंदा कोरोना आजाराच्या गंभीर परिस्थितीत लॉकडाऊन च्या काळात सुद्धा संस्थेतर्फे वृक्ष लागवड करण्यात आली. या वृक्षारोपण प्रसंगी विद्यालयातील काही विद्यार्थ्यांना सुद्धा प्रातिनिधिक स्वरूपात आमंत्रित करण्यात आले होते. याद्वारे वृक्ष लागवडीचे फोटो व छायाचित्रण विद्यालयातील अन्य विद्यार्थ्यांना ऑनलाइन पाठवण्यात येणार असून त्याद्वारे विद्यार्थ्यांमध्ये हे पर्यावरणासाठी वृक्ष लागवडीचे महत्व समजावून सांगण्यात येणार आहे. या कार्यक्रमप्रसंगी सुधीर गोडसे, चेतन पाटील, मंगला गोडसे, राजश्री पाटील, वर्षा देशमुख, विजेता शर्मा,सरिता पाटील,बजरंग मोरे, गणेश पाटील आदी शिक्षक , शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.