जळगाव, दि.११ – कोरोना संशयित रूग्ण शोधण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे रूग्ण शोध पंधरवडा राबविण्यात येत आहे. या मोहिमेतंर्गत जळगाव शहरात महापालिका व सामाजिक संस्थांच्यावतीने लॉकडाऊनच्या काळात रुग्ण शोध व तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेत होत असलेली तपासणी व त्यास नागरिकांचा मिळत असलेला प्रतिसाद याबाबतची पाहणी करण्यासाठी आज सकाळी जिल्हाधिकारी अभिजित राऊत नागरिकांच्या दारी पोहोचले.
जिल्हाधिकारी श्री. राऊत स्वतः आपल्या दारी आल्याचे पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. अनेकांनी जिल्हाधिकाऱ्यांचे कौतुक केले व स्वतःहून कुटुंबीयांची माहिती सर्वेक्षण पथकाला दिली.
जिल्ह्यात कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर श्री. राऊत यांनी जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार हाती घेताच त्यांनी जिल्हा कोविड रुग्णालयात मध्यरात्री भेट देऊन तेथील कामकाजाची पाहणी केली. ‘लॉकडाऊन’ काळात रस्त्यावरून उतरून नागरिकांना लाॅकडाऊनचे पालन करण्याचे आवाहन केले. बंदोबस्ताबाबत पोलिसांना विचारणा करताना आवश्यक तेथे मार्गदर्शक सूचनाही दिल्यात.
जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन विविध उपाययोजना राबवित आहे. त्याचाच एक भाग म्हणून जळगाव महापालिका आणि अमळनेर व भुसावळ नगरपालिका क्षेत्रात सात दिवसांचा लाॅकडाऊन घोषित करण्यात आला आहे. यास नागरिकांचा चांगला प्रतिसाद लाभत आहे. ही बाब लक्षात घेऊन लाॅकडाऊन काळात नागरीक घरातच असल्याने जळगाव शहर महानगरपालिकेचे पथक आणि विविध सामाजिक संस्थातर्फे शहरात रूग्ण शोध व तपासणी मोहिम राबविण्यात येत आहे.
या पथकांमार्फत करण्यात येत असलेल्या तपासणीची तसेच त्यांना नागरिकांचा प्रतिसाद व तपासणी करताना येणा-या अडीअडचणी समजून घेणे. याची पाहणीसाठी आज सकाळी गिरणा टाकी परिसरातील नवीन पोस्टल कॉलनी परिसरात जिल्हाधिकाऱ्यांनी पाहणी केली. सर्वेक्षण पथकासोबत जिल्हाधिकारीही सहभागी झाले होते.
जळगाव शहरातील दिवसेंदिवस वाढणारा कोरोनाचा प्रादुर्भाव बघता महापालिका व जिल्हा प्रशासनाने शहरातील काही सामाजिक संस्था व संघटनांना आवाहन करून ‘रुग्ण शोध मोहीम’ हाती घेतली आहे. यात संपूर्ण शहरातील प्रभाग निहाय विविध संस्थांची मदत घेण्यात येत आहे. यानुसार त्या त्या प्रभागात अन्य संस्थांप्रमाणे संघाचे स्वयंसेवक देखील या मोहिमेत प्रशासनासोबत सर्वेक्षण करीत आहेत.
प्रत्यक्ष नागरिकांमध्ये जाऊन तपासणी केल्यावर आपण आपल्या परीने मानवी संक्रमणाची साखळी तोडण्याचा प्रयत्न केल्याचा आनंद होतो, असे राष्ट्रीय स्वयंसेवकांनी सांगितले.या पथकांसोबत
राजेश ज्ञाने, हितेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सुश्रुत मुळे, योगेश चौधरी, दीपक वाणी, क्षितिज गर्गे, राजेश नाईक आदी १०० पेक्षा जास्त स्वयंसेवक सेवा देत आहेत.
रुग्ण शोध मोहिमेअंतर्गत घरोघरी जाऊन प्रामुख्याने तापमापक यंत्राने ताप मोजणे, ऑक्सिमिटरच्या साहाय्याने ऑक्सिजन पातळी, पल्स रेट मोजणे, तसेच इतर आजार (मधुमेह, क्षयरोग, हृदयरोग)याची नोंद केली जात आहे. त्याचबरोबर एका टीममध्ये एक महापालिका शिक्षक व दोन स्वयंसेवक असे तीन जण आहेत. या प्रमाणे शहरातील ५० भागांत १०० स्वयंसेवक सर्वेक्षण करीत आहेत. प्रत्येक टीममार्फत रोज १०० घरांचे सर्वेक्षण करण्याचे नियोजन आहे. या पथकाच्या सुरक्षेसाठी त्यांना पीपीई कीट, फेसशील्ड, मास्क, ग्लोव्हज, सॅनिटायझर उपलब्ध करून दिले आहे.
जिल्हाधिका-यांची पाचोरा, भडगाव, चाळीसगाव कोविड केअर सेंटरला भेट
जळगाव शहरातील तपासणी मोहिमेची पाहणी केल्यानंतर जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी पाचोरा, भडगाव, चाळीसगाव येथील कोविड केअर सेंटरला भेट दिली व तेथील आरोग्य सुविधा, रूग्णांना मिळणा-या सोयीसुविधा तेथील अडीअडचणी समजून तर घेतल्याच शिवाय अनेक अडचणीचे निराकरण त्यांनी जागेवरच केले. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन सर्वोतोपरी प्रयत्न सुरूआहे. या प्रयत्नांना लोकप्रतिनिधींसह नागरिकांचेही चांगले लाभत आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी नागरिकांनी स्वतःहून तपासणीसाठी पुढे यावे.
ज्या नागरिकांना कोरोना सदृश्य लक्षणे जाणवतील त्यांनी रूग्णालयात जाऊन तपासणी करावी. तसेच यंत्रणेनेही नागरिकांनी चांगल्या सुविधा उपलब्ध होतील याची काळजी घ्यावी. नागरिकांमध्ये उपचाराविषयी विश्वास निर्माण करून आपण सर्वांच्या सहकार्याने कोरोनावर मात करू . असा विश्वासही व्यक्त केला.
यावेळी पाचोरा येथे आमदार किशोर पाटील, उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे तर चाळीसगाव येथे खासदार उन्मेष पाटील, उपविभागीय अधिकारी लक्ष्मीकांत साताळकर यांचेसह पोलिस अधिकारी, तहसीलदार, वैद्यकीय अधिकारी, नगरपालिकांचे मुख्याधिकारी आदिंसह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.