पाचोरा, (प्रतिनिधी)- भडगाव तालुक्यातील लोण प्र.भ. या गावातील लाभार्थ्यांना एप्रिल महिन्यात साखर व मे महिन्यात प्रधानमंत्री गरीब कल्याण योजने अंतर्गत मिळणारी तूरदाळ फक्त कागदावर व ऑनलाईन मिळाली असली तरी प्रत्यक्षात मात्र स्वस्त धान्य दुकानदार यांनी काहीच वाटप केले नाही अशी तक्रार काही गावकऱ्यांनी उपविभागीय अधिकारी पाचोरा यांच्या कार्यालयाकडे केली आहे.
याबाबत अन्न व पुरवठा मंत्री यांना देखील तक्रार केली असून तक्रारीत म्हटले आहे की, भडगाव तालुक्यातील लोण प्र.भ. येथील स्वस्त धान्य दुकानदार यांनी एप्रिल व मे महिन्यात साखर व तूरदाळ प्रत्यक्षात वाटप केली नसून फक्त ऑनलाईन कागदावर वाटप केल्याचे दाखविण्यात आले आहे. त्याच बरोबर प्रधानमंत्री गरीब कल्याण योजने अंतर्गत एका कुटुंबाला प्रति पाच किलो तांदूळ देण्यात येतो मात्र दुकानदार यांनी लाभार्थ्यांचे आधार लिंक नसल्याचे कारण सांगत तांदूळ देखील कमी वाटप केला आहे.
दुकानदाराकडून तक्रारदार यांना प्रलोभन
स्वस्त धान्य दुकानदार यांच्या गैरकारभाराची तक्रार केल्यानंतर दुकानदार यांनी तक्रारदार यांना प्रलोभने दिले असून या बाबत ऑडिओ रेकॉर्डिंग व व्हिडीओ पुरावा देखील असल्याचे तक्रारकर्त्यांचे म्हणणे आहे.तक्रार अर्जावर वाल्मिक अशोक पाटील, सुनील फकिरा पाटील यांच्यासह इतर चोवीस जणांच्या स्वाक्षऱ्या आहेत.