जळगाव – संपूर्ण देशासह राज्यात सध्या कोरोना या विषाणूने हाहाकार माजवला असून राज्यात दिवसेंदिवस कोरोना बाधितांचा आकडा हा वाढतच आहे.पुढील दोन-तीन महिने कसोटीचे असून कोरोनाचा विस्फोट होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.आपल्या सरकारने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पदवी,पदविकेच्या अंतिम वर्ष वगळता सर्व वर्षाच्या परिक्षा रद्द करून विद्यार्थ्यांना दिलासा दिला.मात्र अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांचे काय ? यावर सध्या राजकारण सुरू असून हे अत्यंत दुर्दैवी असून कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता अंतिम वर्षाच्या परिक्षा रद्द करून सदर विद्यार्थ्यांना आतापर्यंतच्या गुणांनुसार योग्य मुल्यमापन करुन गुण देण्यात यावेत, अशी मागणी नंदगाव येथील सामाजिक कार्यकर्ता तथा महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे जळगाव तालुकाध्यक्ष स्वप्निल शांताराम सोनवणे यांनी राज्याचे मुख्यमंत्री,राज्यपाल तसेच उच्च व तंत्र शिक्षणमंत्री यांना मेलद्वारे निवेदन देत केली आहे.
सध्या राज्यभरातील बहुतेक महाविद्यालये हे क्वारंटाईन सेंटर म्हणून वापरले जात आहेत.यामुळे याच महाविद्यालयांमध्ये परिक्षा घेणे अवघड असून विद्यार्थ्यांसाठी धोकादायक पण ठरु शकतं. तसेच जर परिक्षा झालीच तर परिक्षेला येताना-जाताना, उत्तरपत्रिका व प्रश्नपत्रिका घेताना किंवा देताना जर विद्यार्थ्यांचा कोरोना बाधिताशी नकळत संबंध आला आणि त्यांना कोरोनाची लागण झाली तर संपूर्ण वर्गासह महाविद्यालयात कोरोना अधिक पसरणार व यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे बळीही जाऊ शकतात व याची जबाबदारी सरकार अथवा राज्यपाल महोदय घेतील का ? असा सवालही सोनवणे यांनी यावेळी विद्यार्थ्यांच्यावतीने निवेदनामार्फत केला.
सध्याचे कोरोनाचे भयावह वातावरण व त्यात सुरू असलेला हा परिक्षेचा पेच यामुळे संपूर्ण राज्यभरातील विद्यार्थ्यांसह पालकवर्गही मानसिक त्रास सहन करून चिंतेत आहे.यामुळे आपण विद्यार्थी हित जोपासून त्यांच्या जिवाशी खेळ न करता पदवी, पदविकेच्या अंतिम वर्षातील परिक्षाही रद्द करुन विद्यार्थ्यांना योग्य पद्धतीने गुणदान करावे, अशी मागणी राज्यभरातील विद्यार्थी व पालकवर्गातर्फे स्वप्निल सोनवणे यांनी यावेळी केली.