- जळगावात कोरोना चाचणी प्रयोगशाळेच्या कामास प्रारंभ !
- आयसीयू व आयसोलेशन वॉर्डासह गॅस पाईपलाईनचीही उभारणी
- पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांचा यशस्वी पाठपुरावा
- सुमारे 2 कोटीच्या निधीची केली तरतूद
जळगाव प्रतिनिधी दि.२४ :– *सध्या सुरू असणार्या कोरोनाच्या आपत्तीच्या पार्श्वभूमिवर, राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी मागणी केल्यानुसार सरकारने जळगाव येथील वैद्यकीय शासकीय महाविद्यालयात कोरोना चाचणी प्रयोगशाळेच्या उभारणीला मंजुरी देण्यात आली आहे. तसेच महत्वाचे म्हणजे याच्या जोडीला कोरोनाच्या उपचारासाठी अद्ययावत अतिदक्षता विभाग व आयसोलेशन विभाग उभारण्यात आला असून यात ऑक्सीजन गॅस पाईपलाईनची तरतूद करण्यात आली आहे. या दोन्ही कामांसाठी सुमारे २ कोटी रूपयांच्या निधीला मान्यता मिळाली आहे.
याबाबत वृत्त असे की, सध्या कोरोनाच्या प्रादूर्भावामुळे लॉकडाऊन सुरू असून दररोज अनेक संशयित रूग्णांची कोविड-१९ व्हायरसची चाचणी करण्यात येत आहे. अद्याप जळगाव येथे चाचणीची सुविधा नसल्याने संशियतांचे स्वॅब नमूने हे आधी औरंगाबाद तर आता धुळे येथे पाठविण्यात येत आहेत. अर्थात, चाचणीचे अहवाल येण्यासाठी विलंब होत असल्याने रूग्णांवरील उपचारातही विलंब होत असतो. नेमकी हीच अडचण लक्षात घेऊन राज्याचे पाणी पुरवठा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी जळगाव येथे कोरोना संसर्गाच्या चाचणीसाठी प्रयोगशाळेची मागणी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे केली होती. याला त्यांनी मान्यता दिली होती. आता याच प्रयोगशाळेच्या उभारणीसाठी जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी निधीची तरतूद करून प्रशासकीय मान्यता देऊन याच्या कामास प्रारंभ केला आहे.
लॅबसह बळकटीकरणाची कामे
या प्रशासकीय आदेशाच्या अंतर्गत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात व्हीआरडीएल लॅब तयार करणे आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे बळकटीकरण करणे या दोन कामांचा समावेश असून यासाठी एकंदरीत ६० लाख रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. यात कोरोना चाचणीसाठी व्हीआरडीएल लॅब ही जुन्या टिबी वॉर्डमध्ये तयार करण्यात येणार असून यासाठी अॅल्युमिनीयमचे पार्टीशन व दरवाजे; ग्रॅनाईटचा डोअर फ्रेम्स तसेच अन्य सामग्रींचा वापर करण्यात येणार आहे. यामुळे येथे कोविड-१९ विषाणूच्या संसर्गाची चाचणी करण्यात येणार आहे. तर बळकटीकरणाच्या अंतर्गत कोविड-१९ वॉर्डातील दुरूस्तीच्या कामांचा समावेश आहे. तसेच यात नर्सिंग स्टेशनजवळ नवीन आयसीयू उभारण्यात येत आहे. या दोन्ही कामांसाठी अनुक्रमे २९ लाख १७ हजार व ३० लाख रूपयांचा निधी प्राप्त झाला आहे.
ससून नंतर जळगावात अद्ययावत आयसी व विलगीकरण कक्ष
दरम्यान, यासोबत पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी पुण्यातील ससून रूग्णालयाच्या धर्तीवर जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात गॅस सिलेंडर ऐवजी मेडिकल गॅस पाईप लाईनच्या माध्यमातून ऑक्सीजनचा पुरवठा करण्यात यावा अशी प्रणाली उभारण्याचे निर्देश दिले होते. यासाठी आता १ कोटी २८ लाख रूपयांच्या निधीची तरतूद करण्यात आलेली आहे. हा निधी पंतप्रधान गौण खनिज प्रतिष्ठानमधून देण्यात आलेला आहे. याच्या अंतर्गत जिल्हा वैद्यकीय रूग्णालयात तळमजल्यावर २० खाटांचा अद्ययावत अतिदक्षता विभाग म्हणजेच आयसीयू वॉर्ड तर पहिल्या मजल्यावर ६० खाटांचा विलगीकरण कक्ष म्हणजे आयसोलेशन वॉर्ड उभारण्यात येणार आहे. यात मेडिकल गॅस पाईपलाईन सिस्टीम अर्थात एमजीपीएस प्रणालीचा वापर करण्यात येणार आहे. गॅस सिलेंडरच्या अभावी अनेक रूग्ण दगावत असतात. तसेच याच्या उपलब्धतेत अनेकदा अडचणी होत असून यासाठी जास्त जागादेखील लागते. एमजीपीएस प्रणालीमुळे या सर्व अडचणी दूर होणार असून वॉर्डातील सर्व रूग्णांना समान प्रमाणात ऑक्सीजन मिळणार आहे. दरम्यान, हे काम सार्वजनीक बांधकाम खाते व आरोग्य खाते संयुक्तपणे पूर्ण करणार असल्याचे प्रशासकीय आदेशात नमूद करण्यात आले आहे.