“कोरोना कक्षाच्या गार्ड ड्युटी निमित्त” पोलीस विनोद अहिरे यांची ही पोस्ट प्रचंड व्हायलर होत आहे.कोरोणाच्या पार्श्वभूमीवर अनेक समाजसेवी संघटना तसेच शासकीय यंत्रणा आपापल्या परीनं मदत करत आहेत. त्यात चमोको गिरीचे प्रमाणही काही कमी नाही. परंतु पोलीस विनोद अहिरे यांनी आपले यांनी ऐक महिन्याचे वेतन मुख्यमंत्री निधीत तर दिलेच पण प्रत्यक्ष कोरोना कक्षात ड्युटी करतांना नेमक्या काय भावना असतात अंगावर शहारे आणणारी आपल्या अनुभवाची पोस्ट त्यांनी फेसबुक वर पोस्ट केली त्या पोस्टला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. त्यांच्याच शब्दांत त्यांच्या भावना आमच्या वाचकांसाठी आम्ही आपल्या पर्यंत पोहचवीत आहोत.
मी पोलीस नाईक, विनोद पितांबर अहिरे, नेमणूक पोलीस मुख्यालय जळगाव…
काल सकाळी 9 वाजता पोलीस मुख्यालय येथे हजेरी वर उभा असताना हजेरी मास्तरांनी माझे नाव पुकारले की, तुमची ड्युटी कोरोना कक्षाला गार्ड ड्युटी लावण्यात आलेली आहे. हे ऐकताच मनात थोडी भीती निर्माण झाली आणि मनात प्रश्न निर्माण झाला की, आता पर्यंत कोरोनाच्या भीतीने ड्युटी करतांना आणि साधा किराणा घेतांना सुद्धा इतकी काळजी घेत होतो आणि आता तर प्रत्यक्ष ज्या ठिकाणी कोरोना चे पेशंट आहेत, त्याच ठिकाणी आपल्याला प्रत्यक्ष ड्युटी करायची आहे. स्थानिक गुन्हे शाखेला कार्यरत असताना अनेक जोखमीच्या ठिकाणी काम केले. अनेक दंगली मध्ये जीवाची पर्वा न करता मधे घुसून अनेकांच्या मुसक्या आवळल्या आहेत. पण त्या ठिकाणी शत्रू समोर(सामज कंटक) होता आणि कोणावर कार्यवाही करायची आहे, हे माहीत होते. आणि कर्तव्य बजावताना झालेच जखमी किंवा जीव हि गेला तर ते आपल्या पुरते मर्यादित होते. पण आता मात्र परिस्थिती पुर्ण वेगळी होती, शत्रू हा अदृश्य होता. कोठून आपल्यावर या शत्रूचा वार होईल आपल्याला कळणारही नाही, आणि महाराष्ट्रात हि पोलिसांना कोरोणाची लागण झाल्याचे बातम्या ऐकल्या होत्या. आणि ज्याला कोरोना झाला त्याला कशा पद्धतीने प्लास्टिक मधे गुंडाळून उपचार करतात, आणि तो दगावला तर त्याच्या मृत शरीराची कशा पद्धतीने विल्ेवाट लावतात हे ही टीव्ही वर बघितले होते. म्हणून मनात प्रचंड भिती निर्माण झाली. पण मनात हा ही प्रश्न निर्माण झाला की, मा. मुख्यमंत्री साहेबांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन अनेक डॉ.परिचारिका,माजी सैनिक यांनी काम करण्यासाठी हजारोच्या संख्येने अर्ज केले आणि आपण तर कर्तव्यावर आहोत, असे घाबरून कसे चालेल आसे प्रचंड मनात विचारांचं काहूर माजलं होतं. आणि मन पक्क केलं आणि जायचं ठरवलं, तरीही मनात अनेक प्रश्न येतच होते. आपण जरी ड्युटी करतांना मास्क वैगरे वापरून काळजी घेतली आणि तरीही एखाद्या वेळेस आपल्या युनिफॉर्म वर कोरोनाचा विषाणू लागून आला तर….. आणि आपण घरी गेल्यावर “बंडू” (माझा लहान मुलगा) आपण घरी गेल्या गेल्या लगेच अंगावर झापा टाकतो आणि त्याला कोरोनची लागण झाली तर..आणि घरातील सगळे लोक त्याचे प्रेमाने पापे घेतात त्यामुळे त्यांना झाला तर.. असे चित्रच डोळ्यासमोर उभे राहिले आणि डोळ्यात पाणी तरळल, आजपर्यंत अठरा वर्षांचा सर्व्हिस मधे ड्युटी ची इतकी भीती कधीच वाटली न होती मनात असाही प्रश्न आला की, हजेरी मास्तर ला सांगून आपण ड्युटी बदलाऊन घेऊ पण मनात हा ही विचार आला की, आपल्या जागेवर दुसरा कोणीतरी जाईलच ना मग त्यालाही आपल्या सारखे मुलबाळ असतील परिवार असेलच की, आणि आपण तरी कोरोना कक्षाच्या बाहेर गार्ड ड्युटी करणार आहोत, परंतु प्रत्यक्ष कोरोना झालेल्या पेशंटवर जे डॉक्टर, सिस्टर ब्रदर कोरोना कक्षाची सफाई करणारे कर्मचारी ते कसं करत असतील त्यांनाही परिवार आहेच ना मग आपण कशाला घाबरायच असं मन पक्क केलं घरी आल्यावर ड्युटी बद्दल सांगितले घरचे सुद्धा घाबरायला लागले, कारण ते पण टीव्ही वरील बातम्या नेहमी बघत होते, शेवटी घरच्यांना समजावले की, हा कर्तव्याचा एक भागच आहे. आम्ही पोलीस तरी रोज ड्युटी करून घरी तरी येऊ शकतो पण सीमेवरील जवान तर -20 डिग्री मधे देशाचे रक्षण करीत असतात.
आणि एक एक वर्ष त्यांना कुटुंबाचे तोंड पाहायला मिळत नाही, तर मग ठरलं रात्री आठ ते सकाळी आठ पर्यंत ड्युटी करायची होती, जेवण लवकरच उरकलं युनिफॉर्म घातला आणि मुख्यालयातून मास्क, फेसगर्ड मिळाले होते, मी स्वतः ग्लोज आणि डोक्यावरची टोपी विकत आणली होती हे सगळ युनिफॉर्म सह घालत असताना असं वाटत होतं की, आपण युद्ध भूमीवरच युद्ध लढण्यासाठी जातो आहे की काय! असे वाटत होते. सिव्हिल हॉस्पिटल कोरोना कक्षाजवल आलो आणि कळलं की, आणखी दोन कोरोणाचे पेशंट आणि तेरा संशयित आणले आहेत. अजून मनात प्रचंड भीती निर्माण झाली, ती भीती म्हणजे स्वतःच्या जीवाची न होतीच ती भीती फक्त कुटुंबासाठी वाटत होती. डॉक्टरांच सतत ये जा सुरू होते.10/30 वाजता सिस्टर जया जोगी आल्या आणि म्हणाल्या की, तुम्ही जे मास्क लावलेले आहे, ते सर्कल मास्क आहे. असे म्हणून त्यांनी N95मास्क आम्हाला आणून दिले, त्यानंतर फवारणी करणारा कर्मचारी तेथे आला त्याने माझ्या गाडीवर फवरणी केली आणि मी स्वतः वर देखील फवारणी करून घेतली, घसा खूपच कोरडा पडला होता, सोबत पाण्याची बाटली होती पण चेहऱ्यावरून मास्क काढावे लागेल म्हणून उगाच रिस्क नको म्हणून पाणी पिणं सुद्धा टाळलं. अशा रीतीने ड्युटी एकदाची संपली. घरी आलो आणि नेहमी प्रमाणे बंडू झापा टाकत आला पण मीच दुर झालो आणि त्याच्या आईने त्याला चांगले दोन धपाटे दिले आणि सांगितले की, आधी पप्पांना अंघोळ करू दे….
मित्रानो येवढ्या सगळ्या भावना व्यक्त करण्याचे एकच उद्देश आहे की, माझ्या सारखे यंत्रणेतील लाखो अधिकारी, कर्मचारी ही महामारी रोकण्यासाठी काम करत आहेत. त्यांच्या सुद्धा कदाचित ह्याच भावना असतील मी फक्त प्रतिनिधिक स्वरूपात त्या व्यक्त केल्या आहेत.
म्हणून मी तुम्हाला असंही सांगणार नाही की, तुम्ही घरात बसा… कारण मी इतका मोठा ही नाही, आणि तुम्ही इतके अक्कल शुन्य पण नाहीत की, तुम्हाला परिस्थितीच गांभीर्य कळत नसेल, गृहमंत्री, आरोग्यमंत्री स्वतः फिल्डवर आहेत. आणि मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब जिवाचं रान करीत आहेत. ते जीव तोडून तोडून सांगतात की, घरातच बसा.. कोरोणाला हरवायचे असेल तर घरात थांबणे हाच ऐकमात्र उपाय आहे.. तरी देखील स्वतःला अती हुशार समजणारे लोक त्यांच्या सूचनांची पायमल्ली करीत आहेत, ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. काही अती शहाणे लोक म्हणतात की, ऐक दिवस मारायचं आहे. मी तर अशा लोकांना म्हणेल की, तुम्ही खरच जंगलात जाऊन मरा, पण तुमच्या सोबत घरातील निष्पाप जीवांवर उठू नका कारण यामध्ये तुम्ही एकटे मारणार नाही आहेत. तर तुमच्या सोबत तुम्ही इतरांचा सुद्धा जीव घेणार आहात आणि तो अधिकार निसर्गाने कोणालाच देलेला नाही.
बरेच महाभाग असेही म्हणतात की, आपल्या एकट्याच्या बाहेर जाण्याने काय बिघडणार आहे. त्या लोकांना मी ऐक छोटीशी गोष्ट सांगू इच्छितो.
ऐका ठिकाणी भाली मोठी आग लागली होती. आग विझवण्यासाठी संपूर्ण यंत्रणा युद्ध पातळीवर प्रयत्न करीत असते, त्यात ऐक चिमणी देखील कुठून तरी आपल्या चोचीमध्ये ऐक ऐक पाण्याचा थेंब आणून त्या आगीवर टाकत असते तिची ही सगळी धडपड शेजारच्या झाडावर बसलेला कावळा पाहत असतो आणि हसत असतो आणि चिमणीला म्हणतो की, अरे चीवताई तू वेडी आहेस का? इतकी भली मोठी आग लागलेली आहे. आणि इतके सगळे लोक ही आग विझवण्यासाठी प्रयत्न करीत आहेत तरी ही आग विझाण्याचे नाव घेत नाही आणि तुझ्या ऐका थेंबाने ही आग विझनार आहे का? तेव्हा चिमणी कावळ्याला म्हणते हो कावळे दादा तुम्ही म्हणता आहे ते अगदी खरं आहे. माझ्या ऐका थेंबाने ही आग विझानार नाही, पण.. भविष्यात जेव्हा ह्या आगीचा इतिहास लिहला जाईल, तेव्हा माझे नाव आग लावणाऱ्या मधे नसेल तर आग विझवणाऱ्यांमध्ये असेल, आणि माझ्या कुटुंबातील येणारी पिढी माझ्या पासून प्रेरणा घेऊन तेही फक्त आग विझवण्याचेच कार्य करतील .. हे सगळं ऐकून कावळ्याला लाज वाटली आणि कावळा सुद्धा आपल्या चोचीमधे ऐक येक थेंब आणून आग विझवण्यासाठी प्रयत्न करू लागला. सांगायचं तात्पर्य येवढाच आहे की, आता सुद्धा कोरोनाची महाभयंकर आग लागलेली आहे. सरकार आपल्या परीने प्रयत्न करीतच आहे. पण तुम्ही फक्त घरात बसून त्या चिमणीची भूमिका पार पाडावी आणि इतिहासात तुमचं नाव आग लवणाऱ्यांमध्ये नाही तर आग विझवणार्यांमध्ये येईल याची दक्षता घ्या…..
आपला
विनोद पितांबर अहिरे
नेम. पो.मु. जळगांव
9823136399