जळगाव, (प्रतिनिधी)दि.11- कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे यापुढील काळात अधिक खबरदारी घेणे आवश्यक झाले आहे, नागरिकांनी घराबाहेर पडू नये यासाठी पोलीस विभागातर्फे विविध ठिकाणी बंदोबस्त लावण्यात आला आहे. पोलीस कर्मचारी अहोरात्र काम करत आहेत. त्यांचे ही आरोग्य उत्तम राहावे म्हणून पोलीस अधीक्षक पंजाबराव उगले यांच्या विनंतीनुसार जैन इरिगेशन चे अध्यक्ष अशोक जैन यांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन पोलीस विभागाच्या व्हॅनला सुसज्ज निर्जंतुकीकरण उपकरणांनी सुसंगत करुन पोलीस विभागास देण्यात आली आहे.
या व्हॅनमध्ये 300 लिटर क्षमतेची टाकी, सुष्म फवारणी (फॉगर) साहित्य, सोलर नॅनो पंप, वीजपुरवठा नसल्यास बॅटरी वर काम करण्याचा पर्याय देण्यात आला असून यासोबत एक व्हॉल्व्ह देण्यात आला आहे. याद्वारे एखाद्या वाहनाचे किंवा मोठ्या साहित्याचे सुद्धा निर्जंतुकीकरण शक्य होणार आहे, निर्जंतुकीकरण करण्यासाठी पाण्यासोबत क्लॉरीनेटेड वॉटर किंवा सोडियम हायपोक्लोराइड वापरण्यात येते. याच्या वापराने वस्तू किंवा व्यक्तीवरील संक्रमण नष्ट होण्यास मदत होते.