जळगाव, (प्रतिनिधी)- येथील एक 63 वर्षीय महिला ब्रेस्ट कॅन्सरने आजारी होती तिच्यावर गोदावरी रुग्णालयात उपचार सुरु होते. तिला पुढील उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले होते तिचा आज दुपारी मृत्यू झाला आहे.
तसेच एक साडे तीन वर्षीय बालिकेला गेल्या तीन दिवसांपासून त्रास होत असल्याने तीच्या घरच्यांनी आज सकाळी एका खाजगी रुग्णालयात तीला ऍडमिट केले होते. उपचार सुरू असतानाच तिचा खासगी रुग्णालयातच मृत्यू झालेला आहे.
तर एक 60 वर्षीय महिलेला श्वसनाचा त्रास होत असल्याने आज दुपारी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते तिचा आज सायंकाळी मृत्यू झाला आहे.
तीनही रूग्णांचे मृत्यू वेगवेगळ्या परिस्थितीतीत झाले आहे. असे असूनही मृत्यू झालेल्या तिन्ही रुग्णांचे कोरोना संशयीत म्हणून स्वॅपचे नमुने घेण्यात आले आहे. हे नमुने तपासणीसाठी धुळे येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडे पाठविण्यात आले आहे. त्यांचा तपासणी अहवाल अप्राप्त असल्याने त्यांचा मृत्यु नेमका कोणत्या कारणांमुळे झाला हे निश्चित करता येत नाही. अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे यांनी दिली आहे.
सर्व माध्यम प्रतिनिधींना विनंती करण्यात येते की, सध्या सर्वत्र कोरोनाचा फैलाव वाढत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे अशा परिस्थितीत नागरिकांमध्ये जनजागृती होण्यासाठी आपण प्रशासनास सहकार्य करावे. अपुर्या माहितीच्या आधारावर वृत्त प्रसारित केल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरणार नाही याची काळजी घ्यावी. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. अशावेळी माध्यमांनीही प्रशासनास सहकार्य करावे. असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.
त्याचबरोबर अशा घटनांमुळे नागरिकांनी घाबरून न जाता जागरूकता बाळगावी. लॉक डाऊनचे पालन करावे, गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये, विनाकारण रस्त्यावर फिरू नये, त्याचबरोबर तोंडाला मास्क किंवा रुमाल लावावा, दिवसातून किमान चार-पाच वेळा हात स्वच्छ साबणाने धुवावे, कोणीही अफवा पसरवू नये तसेच अफवांवर विश्वास ठेवू नये. असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.