काँग्रेस- राष्ट्रवादीला मोजावी लागली मोठी किंमत
जळगांव : लोकसभा निवडणुकी करिता वंचित बहुजन आघाडीला 12 जागा देऊ करणाऱ्या काँग्रेस – राष्ट्रवादीचा वंचित बहुजन आघाडीमुळे 8 लोकसभा मतदार संघात गेम झाल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. अशोक चव्हाण, सुशीलकुमार शिंदे हे दोन माजी मुख्यमंत्री, राजू शेट्टी यांच्यासारखा मातब्बर शेतकरी नेता, धनंजय मुंडे यांनी प्रतिष्ठेचे केलेले बजरंग सोनावणे, परभणीच्या रूपाने राष्ट्रवादीच्या आशा खिळून असलेले राजेश विटेकर, बुलढाण्याचे डॉ. राजेंद्र शिंगणे, सांगलीचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विशाल पाटील या मातब्बरांचा वंचित बहुजन आघाडीमुळे पुरता गेम झाल्याचे आकडेवारी सांगते.
नांदेड लोकसभा मतदारसंघातून भाजपचे प्रताप चिखलीकर ४ लाख ७५ हजार ८०१ मते घेऊन विजयी झाले. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना ४ लाख ३३ हजार ५०२, मते मिळाली. वंचित बहुजन आघाडीचे यशपाल भिंगे यांनी १ लाख ६२ हजार ६१२ मते घेतली. काँग्रेस आणि वंचितच्या उमेदवारांची बेरीज केली असता ५ लाख ९६ हजार ११४ एवढी होते. त्यामुळे येथे चव्हाण यांना वंचितच्या उमेदवाराचा फटका बसला.
सोलापूर मतदारसंघातून भाजपचे जयसिध्देश्वर स्वामी ५ लाख २४ हजार ९८४ मते घेऊन विजयी झाले. काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांना ३ लाख ६६ हजार ३७७ मते मिळाली. वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांना १ लाख ७० हजार ७ मते मिळाली. काँग्रेस आणि वंचितच्या उमेदवारांची एकत्र बेरीज केली असता ५ लाख ३६ हजार ३८४ एवढी मते होतात. येथेही वंचितच्या उमेदवारामुळे शिंदेना फटका बसला.
अकोला मतदारसंघात भाजपचे संजय धोत्रे ४ लाख १५ हजार ७४० मते घेऊन विजयी झाले. काँग्रेसचे उमेदवार हिदायत पटेल यांना २ लाख ४७ हजार २१ मते मिळाली. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रकाश आंबेडकर यांना २ लाख ७३ हजार ११२ मते मिळाली. काँग्रेस आणि वंचितची एकत्र बेरीज केली तर ५ लाख २० हजार १३३ मते होतात. यामुळे येथेही वंचितचा फटका काँग्रेसला बसला.
बीड मतदारसंघात भाजपच्या प्रीतम मुंडे या ६ लाख ७८ हजार १७५ मते घेऊन विजयी झाल्या. राष्ट्रवादी काँग्रेसचे बजरंग सोनवणे यांना ५ लाख ९० हजार ८०७ मते मिळाली. वंचित बहुजन आघाडीचे प्रा. विष्णू जाधव यांना ९२ हजार १३९ मते मिळाली. राष्ट्रवादी काँग्रेस आणि वंचितच्या मतांची एकत्र बेरीज केली तर ही मते ६ लाख ८२ हजार ९४६ हजार होते. त्यामुळे येथेही वंचितच्या उमेदवाराचा राष्ट्रवादीला फटका बसला.
हातकणंगले मतदारसंघात शिवसेनेचे धैर्यशील माने यांना ४ लाख ८६ हजार ३०९ मते घेऊन विजयी झाले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांना ४ लाख ३६ हजार ५६७ मते मिळाली. वंचित बहुजन आघाडीचे सय्यद अस्लम यांना १ लाख १६ हजार ४५० मते मिळाली. स्वाभिमानी आणि वंचित आघाडीच्या उमेदवारांच्या मतांची एकत्र बेरीज केली तर ५ लाख ५२ हजार ५०७ एवढी होते. त्यामुळे शेट्टी यांना वंचितच्या उमेदवाराचा फटका बसला.
बुलढाणा मतदारसंघात शिवसेनेचे प्रतापराव जाधव ४ लाख ६४ हजार ६१८ मते घेऊन विजयी झाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे डॉ. राजेंद्र शिंगणे यांना ३ लाख ४६ हजार ९७४ मते मिळाली तर वंचित बहुजन आघाडीचे बळीराम सिरस्कार यांना १ लाख ५७ हजार १३९ मते मिळाली. राष्ट्रवादी काँग्रेस आणि वंचित च्या उमेदवारांची एकत्र बेरीज केली तर ५ लाख ४ हजार ११३ मते मिळाली. यामुळे बुलढाण्यात राष्ट्रवादी काँग्रेसला फटका बसला.
परभणी मतदारसंघातून शिवसेनेचे संजय जाधव यांना ५ लाख २९ हजार १४८ मते मिळाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार राजेश विटेकर यांना ४ लाख ९१ हजार २ मते मिळाली. तर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आलमगीर खान यांना १ लाख ४७ हजार ८४९ मते मिळाली. राष्ट्रवादी काँग्रेस आणि वंचित उमेदवाराची एकत्र बेरीज केली असता ती ६ लाख ३८ हजार ८५१ एवढी मते होतात. त्यामुळे विटेकर यांना वंचितच्या उमेदवारामुळे फटका बसला आहे.
सांगली मतदारसंघात भाजपचे संजय पाटील ४ लाख ९७ हजार ५७३ मते घेऊन विजयी झाले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विशाल पाटील यांना ३ लाख ३८ हजार ११६ मते मिळाली. वंचित बहुजन आघाडीचे गोपीचंद पडळकर यांनी २ लाख ९३ हजार ९३ मते घेतली. स्वाभिमानी आणि वंचितच्या मतांची बेरीच केली असता ती ६ लाख ३१ हजार २०९ एवढी होते. त्यामुळे वंचितच्या उमेदवाराचा फटका या मतदारसंघातही बसला आहे.