कर्मचाऱ्यांचे पालकमंत्र्यांना साकडे; कारवाई न केल्यास उपोषणाचा इशारा
जळगाव ;- गेल्या आठवड्यात मु.जे. महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा क्षुलल्क कारणावरून निर्घृण खून करण्यात आला होता. त्यामुळे महाविद्यालय आवारात गुंडगिरीचा प्रश्न समोर आला असून नूतन मराठा महाविद्यालयात गुंडगिरी करणाऱ्या पियुष नरेंद्र पाटील यांच्यासह त्याच्या साथीदारांचा बंदोबस्त करावा अशी मागणी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष पुण्यप्रताप व राजेंद्र वराडे यांनी पालकमंत्र्याना दिलेल्या निवेदनात केली असून कारवाई न झाल्यास उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे.
निवेदनात म्हटले आहे कि, मु.जे. महाविद्यालयात विद्यार्थ्याचा खून झाल्यानंतर विद्यार्थ्यांची सुरक्षा आणि गुंडगिरीचा प्रश्न चव्हाट्यावर आलेला आहे. पियुष नरेंद्र पाटील हा एमए नापास असून तो नूतन महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी आहे. पियुष पाटील आणि त्याच्या साथीदारांवर ३०७ कलमानुसार गंभीर गुन्हा दाखल झाला आहे. मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने त्याचा जमीन नाकारला आहे. तरी देखील जिल्हापेठ पोलीस प्रशासन अशा गुणवृत्तीच्या आरोपीना पाठीशी घालीत आहे. आज हा आरोपी नूतन महाविद्यालयात दहशत माजवीत असून त्याने विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण केले आहे. पियुष पाटील आणि त्याच्या साथीदाराविरुद्ध गुन्हा दाखल करावा अन्यथा १२ जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे. निवेदनावर नूतन मराठा महाविद्यालय शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष पुण्यप्रताप पाटील आणि उपाध्यक्ष राजेंद्र वराडे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.