जळगाव ;- जामनेर तालुक्यातील ढालगाव येथील जिल्हा परिषदेच्या उर्दू शाळेत गेल्या काही दिवसांपासून शिक्षक उपस्थित राहत नसल्याने गुरुवार दि. ४ रोजी विद्यार्थ्यांसह पालकांनी जिल्हापरिषदेवर धडक देऊन प्रांगणातच विद्यार्थ्याची शाळा भरवीत रोष व्यक्त केला. यावेळी शिक्षणाधिकाऱ्यांनी तातडीने तीन शिक्षकांची नेमणूक करण्याचे आश्वासन दिल्याने पालकांसह विद्यार्थी माघारी परतले.
याबाबत माहिती अशी की, ढालगाव येथील जिल्हा परिषदेच्या उर्दू शाळेत इयत्ता १ ते ८ वी पर्यंतचे वर्ग असून या शाळेची पटसंख्या १८५ आहे. शैक्षणिक वर्ष सुरु झाल्यानंतर या शाळेतील तीन शिक्षकांच्या बदल्या ऑनलाईन पद्धतीने करण्यात आल्या होत्या . शाळा सुरु झाल्यापासून गेल्या १५ दिवसांपासून शिक्षक शाळेत न आल्याने शालेय व्यवस्थापन समिती आणि पालकांनी संताप व्यक्त करून शाळेला कुलूप ठोकले. . यांनतर थेट जिल्हापरिषद गाठून शिक्षणाधिकाऱ्याना निवेदन दिले. यावेळी आवारातच विद्यार्थ्याची शाळा भरल्याने खळबळ उडाली होती . यावेळी शिक्षणाधिकाऱ्याना शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष इतबार तडवी, खलील तडवी , खिरुद्दीन तडवी, मोहम्मद शफिक, सादिक तडवी,राजनाबाई तडवी, मन्सूर तडवी, मोसीन तडवी, फर्जना तडवी, माहेराज तडवी सलीम तडवी, मनोज तडवी , यांच्यासह गावातील ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.