मुंबई – राज्यात सत्ता स्थापन झाल्यानंतर राजकीय पक्षांना मुंबई महापालिका निवडणुकीचे वेध लागले आहेत. सत्तेतून पायउतार व्हावं लागलेल्या भाजपासह शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं महापालिका निवडणुकीची तयारी सुरू केली असून, दिल्लीत बहुमत मिळवलेल्या ‘आप’नंही निवडणूक लढवणार असल्याची माहिती आपचे खासदार संजय सिंह यांनी दिली. यावेळी त्यांनी दिल्ली सरकारनं केलेल्या कामांचीही माहिती दिली.
खासदार संजय सिंह यांची मुंबई प्रेस क्लबमध्ये पत्रकार परिषद झाली. यावेळी ते म्हणाले,”मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या काळामध्ये कर वसुली दुप्पट झाली. या वाढलेल्या करामधूनच गरिबांना मोफत सेवा देण्यात आल्या. सरकारी शाळांमध्ये एसी वर्ग सुरू करणारं दिल्ली सरकार पहिलं आहे. सरकारी शाळांचा निकाल खासगी शाळांपेक्षा चांगला आहे, हे प्रथमच घडलं आहे. केजरीवाल सरकारनं सरकारी शाळांमध्ये स्विमिंग पूल, फूटबाॅल मैदानं व मोठंमोठी मैदान तयार केली. आम्ही काय केलं हे बघायची अमेरिकेच्या फर्स्ट लेडीला इच्छा आहे, इतकं चांगलं काम केजरीवाल सरकारच्या काळात झालं. वीज वितरणातला लाॅस ४० टक्के होता, जो आता ८ टक्के आहे. ही सगळी चोरी आम्ही थांबवली. त्यानंतर ग्राहकांना २०० युनिटपर्यंत वीज मोफत दिली. मोफत पाणी, मोफत वीज, महिलांना मोफत बस प्रवास हे देणं सरकारचंच काम आहे. ३२००० कोटी कर वसूली २०१५ मध्ये होती. आता कर वसूली ६२००० कोटीवर आहे म्हणजेच दुप्पट झाली आहे. या पैशातून श्रीमंतांना आम्ही फायदा दिला नाही, तर गरिबांना मोफत जीवनावश्यक सुविधा दिल्या,” असं सिंह म्हणाले. ११ फेब्रुवारीला दिल्ली विधानसभा निवडणुकीचे निकाल लागले. आपनं बहुमताच्या जवळपास दुप्पट जागा जिंकल्या. त्याचबरोबर अरविंद केजरीवाल तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले.