औरंगाबाद – ‘युनिफाइड डिस्ट्रिक्ट इनफॉरमेशन सिस्टम फॉर एज्युकेशन’ (यूडाएस) मध्ये माहिती भरण्यास शाळांनी टाळाटाळ केल्याचे दिसते. जिल्ह्यात तब्बल ४० टक्के शाळांनी ऑनलाइन माहितीच भरलेली नाही. त्यात अनाधिकृत शाळांची संख्या असल्याची शक्यता आहे. माहिती न भरणाऱ्या शाळांवर शिक्षण विभाग कारवाई करणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
शालेय व्यवस्थापनात सुसूत्रता आणण्यासाठी ‘यूडाएस’ उपक्रमात ‘स्कूल रिपोर्ट कार्ड’ तयार होते. त्यामुळे शाळांची मान्यता, विद्यार्थी व शिक्षक संख्या, पायाभूत सुविधांची माहिती एका क्लिकवर उपलब्ध होते. त्यानुसार शैक्षणिक वर्षातील नियोजन केले जाते. तसेच अनाधिकृत शाळांना पोर्टलमुळे आळा बसल्याचाही दावा केला जात आहे. मात्र, राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये ऑनलाइन माहिती भरण्यात शाळा चुकारपणा करत आहेत. माहिती भरण्यासाठी शाळांना १५ फेब्रुवारीपर्यंत मुदत देण्यात आली होती. राज्यात औरंगाबाद जिल्हा माहिती भरण्यात सर्वात मागे म्हणजे ३५व्या क्रमांकांवर आहे. तब्बल ४० टक्के शाळांनी माहिती भरलेली नाही. जिल्ह्यातील चार हजार ५७६ शाळांपैकी ९०९ शाळांनी, तर प्रक्रियाच केलेली नाही. ८४२ शाळांनी अर्धवट प्रक्रिया पूर्ण केली. दीड महिन्यांचा कालावधी देऊनही शाळा माहिती भरण्यास टाळाटाळ करत आहेत. त्यामुळे शाळा माहिती लपवित आहेत का, अशी चर्चा सुरू आहे.
\Bअनधिकृत शाळांची गर्दी\B
‘यूडाएस’ क्रमांक नसलेल्या शाळांना अनाधिकृत समजण्यात येते. या शाळांवर शिक्षक हक्क कायद्यानुसार कारवाई करता येते. मात्र, शिक्षणाधिकारी कार्यालयाकडेच माहिती न भरलेल्या शाळांच्या संख्येबद्दल गोंधळ आहे. अनधिकृत शाळा, संस्थांवर कारवाई केलेली नाही. शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वीच शाळांनी प्रवेश प्रक्रिया राबविण्याची तयारी सुरू केली. अधिकृत माहिती नसल्याने पालक, विद्यार्थी अनधिकृत शाळांत प्रवेश घेतात व त्यांची फसवणूक होते. या परिस्थितीला शिक्षण विभागच काहीप्रमाणात दोषी असल्याचे मानले जात आहे.
जिल्ह्याची सद्यस्थिती
तालुका एकूण शाळा माहिती भरलेल्या शाळा
औरंगाबाद शहर-१ ५२६ २८८
औरंगाबाद शहर-२ ४४८ २७७
औरंगाबाद ५८३ ३२२
गंगापूर ५१८ ३०८
कन्नड ४७१ ३३५
खुलताबाद १८९ १३७
पैठण ४२९ ३०३
सिल्लोड ५१९ ३००
सोयगाव १४२ ६९
वैजापूर ४५४ ३३०
फुलंब्री २९७ १५६
\Bजिल्ह्यातील नोंदणीकृत शाळा ४५७६
‘यूडाएस’ माहिती भरलेल्या शाळा २८२५\B