- रोजनदारी बुडवून कामगार किट मिळवण्यासाठी वनवन भटकत आहे
- किट वाटपासाठी कुठलीही वेळ निश्चित नाही
- जिल्ह्यात दोनच ठिकाणी किट वितरण केंद्र
- जळगाव येथे MIDC परिसरात वितरण केंद्र असल्याने ग्रामीण भागातील कामगारांना पत्ता शोधाशोधसाठी तासनतास होतेय भटकंती
- किट वाटपावर गुणात्मक नियंत्रण ठेवण्यात जिल्हा प्रशासन अपयशी
जळगाव एमआयडीसी येथील वितरण केंद्र व कामगार
जळगाव (विशेष प्रतिनिधी)- कामगार कल्याणकारी मंडळाच्या व कंत्राटदार कंपनीच्या कुचकामी नियोजनामुळे नोंदणीकृत बांधकाम कामगारांना किटसाठी वणवण भटकावं लागत असल्याने त्यांना मानसिक, शारीरिक व आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे. बांधकाम किट वाटपाबाबत
कुठल्याही प्रकारची वेळ ठरविली नसल्याने कित्येकांना भर रस्त्यावर मुक्काम ठोकण्याचा प्रसंगही ओढवत आहे. त्यामुळे शासनाच्या विरोधात सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.
जळगाव जिल्ह्यातील नोंदणीकृत बांधकाम कामगारांना कामगार कल्याणकारी मंडळामार्फत साहित्य वाटप प्रक्रिया सुरू आहे. परंतु योग्य नियोजन न केल्याने कामगारांना किट वाटपाचे केंद्र शोधण्यात वेळ घालवावा लागतो त्यात तासन्तास भल्या पहाटेपासून रांगेत उभे राहावे लागते. कामगारांच्या सोयीकरिता जळगाव शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी किट वाटपाची प्रक्रिया राबविली जाणे अपेक्षित असतांना शहरापासून दूर एमआयडीसी मध्ये सुरु असल्याने पुरुष कामगारांबरोबरच महिला कामगारांनाही मोठा त्रास सहन करावा लागत आहे. मात्र, या समस्येकडे जिल्हा प्रशासन आणि कामगार अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याने किट वाटपाचा गोंधळ सुरू आहे. इमारत व इतर बांधकाम कामगार (रोजगार नियमन व सेवाशर्ती) अधिनियम, 1996 व महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार (रोजगार नियमन व सेवाशर्ती) नियम, 2007 मधील तरतुदीनुसार शासनाने 1 मे 2011 ला महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ या त्रिपक्षीय मंडळाची स्थापना केलेली आहे. याअंतर्गत 21 ऑक्टोबर 2013 रोजी बांधकाम कामगारांना भेटवस्तू देण्याचा ठराव केला आहे. त्यानुसार उद्योग, ऊर्जा आणि कामगार विभागाने 24 जानेवारी 2014 च्या शासन निर्णयानुसार बांधकाम कामगारांना मच्छरदाणी, ब्लॅंकेट, चादर, जेवणाचा डब्बा, चटई या पाच वस्तू खरेदी करण्यासाठी तीन हजार रुपये दिले जात आहेत. शासनाच्या आदेशाप्रमाणे जिल्ह्यातील नोंदणीकृत कामगारांना गेल्या काही दिवसांपासून बांधकाम किट वाटप कार्यक्रम
सुरू आहे. अनेक ठिकाणी राजकीय नेत्यांच्या हस्ते किटचे वितरणसुद्धा करण्यात आले. मात्र, किट वाटपाचे नियोजन, कामगारांना
होत असलेला त्रास, याचा विचार केला जात नसल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत.
याबाबत सहाय्यक कामगार आयुक्त चं.ना.बिरार यांची भेट घेऊन माहिती घेतली असता ते म्हणाले की आजपर्यंत 19608 कामगारांना या किट चे वाटप करण्यात आले आहे. राज्य स्तरावरून हे टेंडर प्रोसेस झाले असल्याने यावर आमचे नियंत्रण नाही असे ते म्हणाले. कामगारांना देण्यात येणारे साहित्य हे योग्य, दर्जेदार आहे की नाही याची गुणात्मक चाचणी अथवा याबाबत नियंत्रण ठेवण्या बाबत आम्हाला वरिष्ठ स्तरावरून कुठल्याच सूचना नाही तसेच कामगारांना कुठले साहित्य देणे गरजेचे आहे या बाबत देखील आमच्या कडे मार्गदर्शक सूचना नसल्याने आम्ही फक्त कामगार नोंदणी करून पडताडनी करतो या पलीकडे आमचा या किट वाटपात काही सहभाग नसल्याचे सांगितले असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
कामगारांना किट वाटपाचे कंत्राट मुबंईच्या खाजगी कंपनीला देण्यात आले आहे.मात्र टेंडर राज्य स्तरावरून झाल्याने जिल्हा प्रशासना स्तरावरून या किट वाटप चे गुण मूल्यांकन करण्याची यंत्रणाच उपलब्ध नसल्याने या सर्व प्रक्रियेवर संशय निर्माण होत आहे.
किट वितरणाचे दोनच केंद्र
जळगाव जिल्ह्यात कामगारांना सेफ्टी संच व अत्यावश्यक संच वितरित करण्यासाठी जळगाव (MIDC) व भडगाव येथे दोनच वितरण केंद्र सुरु असल्याने कामगारांना याचा चांगलाच त्रास सहन करावा लागत आहे.याकडे जिल्हा प्रशासनाने लक्ष घालावे अशी मागणी कामगारांकडून होत आहे.