पुणे – शालेय वेळेत शिक्षकांनी विद्यार्थ्यांना ज्ञानाचे धडे देण्यासह भविष्याचा वेधही घ्यायला शिकवणे गरजेचे असते. मात्र, शाळेत विद्यार्थ्यांना शिकवण्याचे सोडून, शिक्षक हातातील मोबाइलमध्ये असलेल्या फेसबुक, व्हॉट्सअॅपसारख्या सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे निष्पन्न झाले असून, विविध पोस्ट्सवरही कमेंट्स करीत असल्याचे निदान झाल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. शिक्षकांच्या ऑनलाइन बदल्यांसंदर्भात शिक्षकांच्या नेमक्या काय अपेक्षा आहेत, हे जाणून घेताना हे वास्तव समोर आले आहे. पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली राज्य सरकारने अभ्यासगट स्थापन केला. त्याची पुण्यात बैठक झाली. अभ्यासगटाच्या निमित्ताने आयुष प्रसाद यांनी शिक्षकांशी संवाद साधण्यासाठी फेसबुक पेज तयार केले आहे. त्यावर बदल्यांसंदर्भात काही आक्षेप, सूचना करण्यास सांगितले होते. त्यावर त्यांनी विविध प्रश्न उपस्थित करून, शिक्षकांकडून उत्तरे मागितली होती. त्या फेसबुक पेजवर शाळेच्या वेळेतच शिक्षकांनी कॉमेंट्स केल्याचे आढळून आले आहे. शाळेच्या वेळेत शिक्षकांनी विद्यार्थ्यांना गणितापासून सामान्य विज्ञानापर्यंतची कोडी समजावणे अपेक्षित आहे. त्यांच्या शंका, समस्या दूर करणे, एखाद्या विषयाबाबत विद्यार्थ्याचे आकलन झाले की नाही, याची खात्री करणे अपेक्षित असते. मात्र, विद्यार्थ्यांना काहीतरी धडा देऊन, शिक्षक मात्र सोशल मीडियावर मश्गुल असल्याचे दिसून आले आहे. मात्र, या फेसबुक पेजवर अनेक शिक्षकांनी ऑनलाइन बदली प्रक्रियेवर आक्षेप नोंदविले आहेत. त्यावर त्यांच्या प्रतिक्रिया नोंदविल्याचे दिसून आले आहे. विद्यार्थ्यांना शाळे आवडावी, शिक्षण आवडावे; तसेच ज्ञानार्जन व्हावे, यासाठी जिल्हा परिषद विविध उपक्रम राबवित असते. मात्र, त्या प्रयत्नांना शिक्षकांच्या कृतीमुळे तडा जात असल्याचे अधोरेखित झाले आहे. यावर पुणे जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग गांभीर्याने विचार करू लागला आहे.