रोहिणी येथे सुरू असलेल्या चारा छावणीचा समारोप
चाळीसगाव – संपूर्ण महाराष्ट्रात कुठेही दुष्काळी परिस्थिती निर्माण होणार नाही, एवढा पाऊस आपल्याकडे पडतो. मात्र, तरीही दुष्काळी परिस्थिती जी निर्माण होते, त्याला कारण चुकीचे व्यवस्थापन आहे. त्यामुळे पावसाचे पाणी योग्य पद्धतीने अडवून जिरवले तरच दुष्काळ मिटेल. अन्यथा चारा छावणीसारखी माणसांसाठीची छावणी भविष्यात उभारावी लागेल’, असा सूचक इशारा ‘शिरपूर पॅटर्न’चे जनक सुरेश खानापूरकर यांनी दिला.
येथे मंगेश चव्हाण यांच्या दातृत्वातून दोन महिन्यांपूर्वी उभारण्यात आलेल्या चारा छावणीच्या समारोप समारंभात ते बोलत होते. मंगेश चव्हाण यांच्यासह योगाचार्य वसंतराव चंद्रात्रे, जिल्हा बँकेचे संचालक राजेंद्र राठोड, सरपंच सविता नागरे, नगरसेवक चंद्रकांत तायडे, सोमसिंग राजपूत, प्रभाकर चौधरी, बाळासाहेब राऊत, धनंजय मांडोळे, रवी मराठे, अविनाश चौधरी, आर. डी. चौधरी आदी व्यासपीठावर उपस्थित होते. राज्यात सर्वत्र टंचाई असताना शिरपूर शहरासह तालुका पाण्याच्या बाबतीत समृद्ध आहे. जलसंधारणाची व्याख्या त्यावेळी काँग्रेसचे आमदार असलेल्या अमरीशभाई पटेलांना कळल्याने त्यांचा तालुका पाणीटंचाईमुक्त झाला आहे. आजही ७० गावातील २१० बंधारे पाऊस नसतानाही भरले आहेत. आपल्या भागात पाऊस कमी होतो, ही काही लोकांनी पसरवलेली अफवा आहे. ३ लाख ७७० कोटी खर्च करुनही दुष्काळ मिटलेला नाही. जलसंधारणाची जी काही कामे झाली आहेत त्यांचे नियोजन नाल्याने काहीच उपयोग नाही. म्हणूनच दुष्काळ दूर करण्यासाठी शास्त्रोक्त पद्धतीनेच पाणी अडवून ते जिरवण्याचे काम झाले पाहिजे. कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांऐवजी सिमेंटचे गेट नसलेले पक्के बंधारे बांधावेत. यावर्षी पडलेल्या पावसाची पुढच्या वर्षी पडणाऱ्या पावसाशी भेट झाली तर दुष्काळ निर्माण होत नाही. कुठलाही यज्ञ करुन पाऊस पडत नसतो असे सांगून जलसंधारणाच्या कामांना मार्गदर्शन करण्यासाठी मी नेहमीच मंगेश चव्हाण यांच्यासोबत उपलब्ध असेल,
या भागात चांगली कामे करण्यासाठी मंगेश चव्हाणांना साथ द्यावी, असे आवाहन त्यांनी केले.