ब. गो. शानभाग विद्यालयात पोस्टर्स प्रदर्शनातून जनजागृती
जळगाव दि. 29 : पाण्याचे वाढते दुर्भिक्ष्य लक्षात घेता पाण्याचे महत्त्व, पाणी बचतीसोबतच जल पुनर्रभरणाचे संस्कार बालवयातच रूजावे, यासाठी भवरलाल एण्ड कांताबाई जैन फाउंडेशन आणि जैन इरिगेशन सिस्टिम्स लि.यांच्या संयुक्त विद्यमाने ‘जलसंरक्षण अभियानास’ आज कै. श्रीमती ब. गो. शानभाग विद्यालयात पोस्टर्स प्रदर्शनातूनसुरवात करण्यात आली.
अभियानाचे उद्घाटन तुळशीच्या रोपट्याला पाणी देऊन अभिनव पद्धतीने करण्यात आले. याप्रसंगी विवेकानंद प्रतिष्ठान संचालित कै. श्रीमती ब. गो. शानभाग विद्यालयाच्या मुख्याध्यापिका अंजली महाजन, उपमुख्याध्यापक जयंत टेंभरे, विभागप्रमुख जगदीश चौधरी, गांधी रिसर्च फाउंडेशनचे भुजंगराव बोबडे, जैन इरिगेशनचे सहकारी दिनेश दीक्षित,आनंद पाटील उपस्थित होते. जलसंरक्षण अभियानामध्ये पाणी बचतीवर प्रबोधनात्मक असे 60 पोस्टर्स ब. गो. शानभाग विद्यालयाच्या टिंकेरींग लॅब येथे लावण्यात आले. यामध्ये पाण्याविषयी महापुरूषांचे विचार, पाणीबचतीसाठी करावयाचे प्रयत्न असे प्रबोधनात्मक विषयावर पोस्टर्स तयार करण्यात आले आहेत. हे प्रदर्शन आठवडाभर विद्यार्थ्यांना पाहता येईल. यावेळी भुजंगराव बोबडे यांचे भारतीय जलसंस्कृती या विषयावर व्याख्यान झाले. जगभरातील पाण्याचे स्त्रोत, पाणी वितरणाच्या पारंपरिक पद्धती त्यांनीसांगितल्यात. खान्देशातील प्राचीन पाणी व्यवस्थापन पद्धत, अंजिठा, पाठणादेवी, मनुदेवी येथील पाण्याची संस्कृती याबाबत विद्यार्थ्यांना सादरीकरणाद्वारे मार्गदर्शन केले. प्रास्ताविक व परिचय इतिहास विषयाचे शिक्षक प्रविण पाटील यांनी केले. याप्रसंगी सचिन बेलदार यांच्यासह विद्यालयाचे शिक्षक आणि शिक्षिका उपस्थित होत्या.