जळगाव, दिनांक 28 – जंक फूड खाण्याकडे मुलांचा कल वाढत असून त्यामुळे आजार बळावू लागले आहेत. त्यामुळेच शाळा, कॉलेजमधील विद्यार्थ्यांना जंक फुडपासून दूर ठेवण्यासाठी अन्न व औषध प्रशासन, जळगाव या कार्यालयाने पाऊल उचलले आहे.
शाळा, कॉलेजच्या कँटीनच्या मेनूमध्ये आवश्यक बदल करुन विद्यार्थ्यांना सकस आणि संतुलित आहार उपलब्ध करुन देण्याविषयी प्रशासनाच्या आयुक्त श्रीमती पल्लवी दराडे यांनी हा उपक्रम हाती घेतलेला आहे. त्या अनुषंगाने अन्न व औषध प्रशासन, जळगाव या कार्यालयाने जळगाव जिल्ह्यातील 911 शाळा, कॉलेजला याबाबत लेखी कळविले आहे.
या विशेष मोहीमेत अन्न व औषध प्रशासन, जळगाव या कार्यालयातील अन्न सुरक्षा अधिकारी यांनी विविध तालुक्यातील शाळा व कॉलेजच्या मुख्याध्यापकांच्या प्रत्यक्ष भेटी घेवून कँटीनमध्ये विद्यार्थ्यांना सकस आहार उपलब्ध करुन देण्याबाबत आवाहन केले जात आहे. तसेच अन्न व औषध प्रशासनाकडून पालक वर्गाला देखील याबाबत जागरुक केले जात असल्याची माहीती अन्न व औषध प्रशासन, जळगाव या कार्यालयाचे सहायक आयुक्त श्री. यो. कों. बेंडकुळे यांनी दिली आहे.
या मोहिमेचा भाग म्हणून 27 जून रोजी प.न.लुंकड कन्या शाळा, जळगाव येथे जिल्ह्यातील खाजगी शाळा व महाविद्यालयांचे मुख्याध्यापक यांची शिक्षणाधिकारी, जळगाव यांच्या उपस्थितीत सभा घेऊन अन्न व औषध प्रशासनातर्फे शाळामध्ये जंक फुड, फास्ट फुड मुलांना देण्यात येवू नये, तसेच त्यांचे शाळांमधील मेनू तसेच कँटीन असल्यास कँटीनमधील अन्नपदार्थ हे दर्जेदार व पोषक असावेत. मुलांना भोजनात परीपूर्ण व पोषक आहार तसेच सुरक्षित अन्न मिळावे याबाबत तसेच स्वच्छतेबाबत मार्गदर्शन करण्यात येत आहे.
याकरिता अन्न व औषध प्रशासनातील अधिकारी विवेक पाटील, किशोर साळुंके, सुवर्णा महाजन हे जिल्ह्यातील शाळा व महाविद्यालयात प्रत्यक्ष भेटी देत आहेत.