पाचोरा – येथे पीटीसी संस्थेच्या वतीने आयोजित हास्य कविसंमेलनात रसिक हाश्याने लोटपोट झाले. रविवार ता 2 रोजी ही काव्य रजनी चांगलीच रंगली.
पीटीसी संस्थेची स्थापना व विस्तारासाठी योगदान देणारे कै. द मो परांजपे, कै सु भा पाटील, कै बाबूभाई रावल,कै वाय बी शर्मा, कै के एम बापू पाटील ,कै आर एस दादा थेपडे,कै ओंकार आप्पा वाघ व कै अॅड एस आर अण्णा देशमुख यांच्या स्मृती निमित्ताने रविवार ता 2 रोजी रात्री हास्य कवि संमेलनाचे आयोजन करण्यात आले.
या काव्य रजनीत नितीन देशमुख (चांदूरबाजार) अरुण पवार (बीड) गौतम गुडधे( परतवाडा) या कवींनी मराठी,बोलीभाषा ,अहिराणी ,
वऱ्हाडी ,उर्दू व हिंदी अशा विविध भाषांमधून काव्यरचना सादर केल्या. तसेच बोली भाषा टिकली तर कष्टकरी व सामान्य टिकतील. समाजाचे प्रतिबिंब बोलीभाषेच्या माध्यमातून उमटत असते. विनोदी कवितांमधून हास्याचे फवारे उडविण्या सोबतच अंतर्मुख होऊन त्यातील संवेदना व मर्म ओळखले पाहिजे .असा संदेश देऊन तरुणांमधील वाढती व्यसनाधीनता, शेतकरी आत्महत्या ,शेतीची होत असलेली दशा ,व्यसनमुक्ती ,पर्यावरण संतुलन ,महिलांवरील अत्याचार, गर्भलिंगनिदान या विषयांवर प्रबोधन करण्यात आले. तसेच स्वार्थी राजकीय धोरणांबाबत टीकात्मक विवेचनही या कवींनी केले .
मराठवाडा ,खानदेश व विदर्भ या तीनही प्रांतांना एकत्रित आणून या प्रांतातील भाषेच्या माध्यमातून सादर करण्यात आलेल्या कवितां मुळे प्रांतीय व भाषिक एकतेचा संदेशही द्विगूणित करण्यात आला.
नितीन देशमुख यांच्या विनोदी कवितेने या काव्य रजनीचा प्रारंभ झाला .त्यांची ‘डाळिंबाच्या ओठावरती कडूलिंबाचे गाणे ‘ही कविता रसिकांना चांगलीच भावली. अरुण पवार यांच्या ‘अफू’ या कवितेतून शेतकऱ्यांच्या आत्महत्या व शेतीविषयक प्रश्न मांडल्याने रसिक प्रचंड भावनिक बनले. गौतम गुडधे यांनी सादर केलेल्या ‘सारेच कसे चयले’ या कवितेने हास्याचे फवारे उडवत वन्समोरही मिळवला .पवार यांनी ‘वायले राहिली मुले’ ही विभक्त कुटुंब पद्धतीवर आधारित कविता सादर करून उपस्थित सार्यांनाच अंतर्मुख केले. थंडीची अंगाला बोचणारी मंद झूळूक, रंगीबेरंगी प्रकाश छटांची बरसात व चांदणी रात्र अशा प्रसन्न वातावरणात ही काव्य रजनी पार पडली. बोचऱ्या थंडीत उपस्थित रसिकांना हास्याची उब मिळाल्याने रसिक सर्वार्थाने तृप्त झाले .संस्थेच्या वतीने अध्यक्ष तथा माजी आमदार दिलीप वाघ, चेअरमन संजय वाघ यांनी उपस्थित कवींचा सत्कार केला . संजय वाघ यांनी संस्थेच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध सामाजिक व प्रबोधनात्मक उपक्रमांचा आढावा घेऊन संस्थेच्या गुणवत्ता विकासाचा लेखाजोखा मांडला.
याप्रसंगी दिलीप वाघ, संजय वाघ, ॲड महेश देशमुख ,व्ही टी जोशी, विनय जकातदार,डॉ जयंत पाटील, खलील देशमुख, नाना देवरे, सतीश चौधरी, डॉ मनोज पाटील, ॲड एस पी पाटील ,दुष्यंत रावल, हारुण देशमुख, योगेश पाटील, सुभाष पाटील, प्रकाश पाटील ,अर्जुंनदास पंजाबी, प्राचार्य डॉ बी एन पाटील, प्राचार्य डॉ एन एन गायकवाड (भडगाव) ,उपप्राचार्य प्रा डॉ वासुदेव वले ,प्रा शरद पाटील, आर एल पाटील ,संजय सूर्यवंशी, मुख्याध्यापक एस डी पाटील, आर एल पाटील, सुचेता वाघ ,ज्योती वाघ, प्रमिला वाघ, प्रमिला पाटील, सुरेखा पाटील,डॉ ग्रीष्मा पाटील, भूषण वाघ, आकाश वाघ, आदि उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजय वाघ यांनी केले .प्रा डाॅ वासुदेव वले यांनी कवींचा परिचय दिला- महेश कोंडीण्य व अजय अहिरे यांनी सूत्रसंचलन केले. प्राचार्य बी एन पाटील यांनी आभार मानले.