आ. भोळेंच्या भुमिकेची महापालिकेच्या राजकारणात उजळणी
आनंद गोरे
जळगाव – शहरात महापालिकेतील सध्याचे कुरघोड्यांचे राजकारण, पालकमंत्री ना. गिरीश महाजन यांचे वाढते वर्चस्व जाणूनबुजून लोकांपुढे ठसवण्याचे त्यांच्या समर्थकांचे प्रयत्न, भाजपला लोकसभा निवडणुकीत मिळालेले यश, ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांच्याशी आ. भोळे ‘सुरक्षित अंतर’ राखून असल्याची चर्चा, वरिष्ठ पातळीवर भाजप-शिवसेना नेत्यांकडून युतीबद्दल घेतल्या गेलेल्या भूमिका व त्यांचे स्थानिक पातळीवरील पडसाद; या सर्वांच्या पार्श्वभूमीवर आता आ. राजूमामा भोळे पुन्हा चर्चेत आले आहेत. युती असो की नसो; पुढचाही आमदार मीच! , या त्यांच्या भुमिकेची महापालिकेच्या राजकारणात उजळणी होते आहे.
कालच महापालिकेची बँक खाती हुडकोच्या कर्जाच्या ताणामुळे पुन्हा सील झाल्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेतील विरोधी पक्ष नेते सूनील महाजन यांनी पत्रपरिषद घेत शिवसेनेची भूमिका स्पष्ट केली होती. महापालिकेतील भाजपच्या कार्यपध्दतीवरही त्यांनी बोट ठेवले होते. या पत्रपरिषदेनंतर च्या अनोैपचारिक गप्पांमध्ये शरद तायडे, सूनील महाजन यांच्यासह बंटी जोशी, गणेश सोनवणे, प्रशांत नाईक, यांनी आ. भोळे यांच्या आडमूठेपणाचा उल्लेख करत ही उजळणी केली.
मागील विधानसभा निवडणुकीत भाजप व सेना एकमेकांच्या विरोधात लढली. आता युती असली तरीही जळगाव शहर मतदारसंघातून मीच आमदार राहणार असल्याचे स्पष्ट मत आ. राजूमामा भोळे यांनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या काळात महायुतीच्या मेळाव्यानंतर स्नेह भोजनप्रसंगी पत्रकारांशी वार्तालापात व्यक्त केले होते.
. माजी आ. सुरेशदादा जैन यांनी त्या मेळाव्यात मी आमदारकी लढणार नसल्याचे सूतोवाच केले होते. याला उत्तर देताना राजुमामा भोळे यांनी त्यांचे मत व्यक्त केले होते.
विधानसभेला शहरातून उमेदवारी करणार नाही; युतीच्या सूत्रामध्ये शहराची जागा ज्या पक्षाला सुटेल त्याचे काम सर्वांनी प्रामाणिकपणे केले पाहिजे. शिवसेनेला जागा सुटली तर भाजपने पूर्ण मदत करावी. भाजपला सुटली तर आम्ही म्हणजे शिवसेना म्हणून पूर्ण मदत करू. जे युतीमध्ये ठरले ते पाळले पाहिजे, असे माजी आमदार सुरेश जैन यांनी आमदार सुरेश भोळे यांना उद्देशून सांगितले होते, याची प्रकर्षाने आठवण काल पुन्हा शरद तायडे, सूनील महाजन यांच्यासह बंटी जोशी, गणेश सोनवणे आदींनी करून दिली.
साडेचार वर्ष एकमेकांविरोधात उभे ठाकले असताना हिंदुत्वाच्या मुद्यावर भाजप- शिवसेनेत युती झाली लोकसभा निवडणुकीत आम्ही सर्व वैर विसरून भाजपसाठी मते मागत आहेत. हे प्रेम आणि युती विधानसभेपर्यंत टिकवा. आम्ही तुमचे काम करीत असल्याने सहा महिन्यांनी होणार्या निवडणुकीत भाजपनेदेखील प्रामाणिकपणे आमचे काम करावे, अशी अपेक्षा व्यक्त करीत शिवसेना नेत्यांनी मेळाव्यात मंत्री गिरीश महाजनांची मूठ सोडवून घेतली होती.
यावेळी जळगाव शहर व भुसावळ हे शिवसेनेचे पारंपारिक मतदारसंघ असल्याचे सांगत जिल्ह्यातील शिवसेना या जागा स्वत:कडेच ठेवण्याचा मुद्द्यावर काहीच तडजोड करणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. अर्थात ही शिवसेनेच्या स्थानिक कार्यकर्त्यांची भावना असून ती या दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी दुर्लक्ष करण्यासारखी समजू नये म्हणून आम्ही हे बोलत असल्याचे ते म्हणाले.
मतदारसंघ विभाजनानंतर शहर मतदारसंघ अस्तित्वात आला व युती तुटली होती. तथापि या मतदारसंघावर आता शिवसेनाच दावा करणार असल्याचा स्थानिक शिवसेनेचा ‘ मूड ’ मात्र या अनौपचारिक गप्पांमधून काल स्पष्ट झाला. त्यामुळे यापुढच्या काळात राजूमामा भोळे कोणत्या मुद्यांवर काय भूमिका घेणार?, याची उत्सुकता पुन्हा वाढली आहे. ही जागा शिवसेनेला मिळाली तर सेेनेतील इच्छुकांना डावलून सेना नेते राजुमामा भोळेंना उमेदवारी देण्यासाठी सेनेत प्रवेश देतील का?, की या मतदारसंघापुरती युती तोडून दोन्ही पक्ष आपापले उमेदवार निवडणुकीत उतरवतील?, की युतीच्या अधिकृत उमेदवारांविरूध्द बंडखोरी करून आ. भोळे मैदानात उतरतील ; अशा नव्या चर्चांना आता तोंड फुटले आहे.
जळगाव शहर मतदारसंघातून शिवसेनेकडून सूनील महाजन, नितीन लढ्ढा व विष्णू भंगाळे विधानसभा निवडणुकीसाठी इच्छूक असल्याची चर्चा आधीपासूच सुरू असताना या अनौपचारिक गप्पांमधील ‘ स्थानिक शिवसेनेचा मूड’ त्यांना बळ देणारा समजला जाणार आहे.
असेच प्रश्न आता भुसावळच्या जागेबद्दलही विचारले जाऊ शकतात. तेथे संजय सावकारे पहिल्यांदा राष्ट्रवादीकडून व नंतर भाजपकडून निवडून आलेले आहेत. त्यांचे नाथाभाऊंशी असलेले सख्य जगजाहीर आहे. त्या जागेवरही शिवसेनेकडून सावकारेंना उमेदवारी मिळणे अशक्य आहे. शिवसेना ती जागा भाजपला देणारच नसेल तर भाजपची भूमिका काय असेल , याची उत्सुकता वाढते आहे. संतोष चौधरी यांच्या आधी शिवसेनेचे दिलीप भोळे भुसावळचे आमदार होते.