मुंबई – मुंबई महापालिकेचा २०२०-२०२१ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प आज महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी सादर केला. ३३,४३४.५० कोटी रुपयांचा हा अर्थसंकल्प असून गेल्या वर्षीच्या तुलनेत अर्थसंकल्पात यंदा २७४१.९१कोटी रुपयांची वाढ झाली आहे. महापालिकेने यंदा मुंबईकरांवर कोणताही कर लादलेला नसला तरी पालिकेची आर्थिक स्थिती मात्र कमालीची खालवली आहे. आर्थिक स्थिती सावरण्यासाठी मुंबई महापालिका यंदा पालिकेच्या राखीव निधीतून ४३८० कोटी रुपयांचे कर्ज घेणार आहे. आर्थिक स्थिती खालावल्याने पालिकेने थेट नोकर भरतीही रोखली आहे.
महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्याकडे २०२०-२०२१ या आर्थिक वर्षांसाठीचा अर्थसंकल्प सादर केला. ३३,४३४.५० कोटी रुपयांचा हा अर्थसंकल्प आहे. गतवर्षी ३०,६९२.५९ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प होता, त्या तुलनेत यंदा २७४१.९१ कोटी रुपयांची वाढ झाली आहे. या अर्थसंकल्पात मुंबईकरांवर कोणत्याही प्रकारचा बोझा टाकण्यात आला नसला तरी मुंबईकरांसाठी अपवाद वगळता नव्या घोषणाही केलेल्या नाहीत. महापालिकेची आर्थिक स्थिती खालावल्याने सर्व प्रकारच्या खर्चात कपात करण्यासाठी पालिकेने थेट नोकर भरतीही रोखली आहे. शिवाय पालिकेत निवृत्तीमुळे होणारी पदेही भरली जाणार नसल्याचं अर्थसंकल्पात स्पष्ट करण्यात आलं आहे.