जळगाव (प्रतिनिधी) येथील डॉ. जी. डी. बेंडाळे महाविद्यालयाच्या खाणावळीत घरगुती सिलिंडरचा वापर होत असल्याने छापा टाकून 21 घरगुती गॅस सिलिंडर जप्त आज करण्यात आले. ही कारवाई जिल्हा पुरवठा विभागाने केली आहे.
जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील सूर्यवंशी यांना आज सायंकाळी सातला निनावी फोन आला. की बेंडाळे महाविद्यालयाच्या ओम साई कॅन्टीनमध्ये स्वयंपाक तयार करण्यासाठी घरगुती गॅस सिलिंडरचा वापर होत आहे. त्यानुसार तालुका पुरवठा निरीक्षक के. आर. तडवी, डी.बी.जाधव, यांच्यासह पुरवठा विभागाच्या पथकाने छापा टाकून सिलिंडरची तपासणी केली. त्यात हिंदुस्तान पेट्रोलियम, भारत पेट्रोलियम कंपनीचे 21 घरगुती सिलिंडर आढळून आले आहेत. त्यापैकी चार भरलेले आहेत तर 17 रिकामे आहेत. यावरून बेंडाळे महाविद्यालयाच्या ओम साई कॅन्टीनमध्ये सर्रास घरगुती सिलिंडरचा वापर होतो. जो चुकीचा आहे. कमर्शिअल सिलिंडर वापरणे गरजेचे होते. कॅन्टीनचे मालक प्रवीण चावला आहे. मात्र त्यांनी पुरवठा विभागाने केलेल्या पंचनाम्यावर सही करण्यास नकार दिला. पुढील चौकशी करून दोषींविरुद्ध कठोर कारवाई करणार असल्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील सूर्यवंशी यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलतांना सांगितले.