मुंबई – ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी याच्यावर टीका करणारेसुद्धा त्यांना नंतर प्रिय होतात. त्यांच्या वॉर्डात जाऊन मोदी प्रचार करतात, ही नैतिकता आहे का’, असा सवाल करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी आणि भारतीय जनता पक्षावर टीकेचे बाण सोडले आहेत. रामविलास पासवान त्यांच्याबद्दल काय बोलले होते? नितीशकुमार काय बोलले होते?, असे प्रश्न विचारतानाच, आता बिहारमध्येच त्यांची आपापसात लागलीय, तरी ते एकमेकांच्या मांडीला मांडी लावून बसलेले आहेत. त्यामुळे तुम्ही नैतिकता शिकवू नका. यांच्याकडून (भाजप) राज्याला आणि देशाला नैतिकता शिकण्याची गरज नाही, अशा शब्दांत मुख्यमंत्री ठाकरे यांनी आपल्यावर नैतिकतेच्या मुद्द्यावरून टीका करणाऱ्या भारतीय जनता पक्षाला खडे बोल सुनावले आहेत.
शिवसेनेच्या ‘सामना’ या मुखपत्राला दिलेल्या विशेष पहिल्या मुलाखतीत मुख्यमंत्री बोलत होते. सामनाचे कार्यकारी संपादक, खासदार संजय राऊत यांनी विचारलेल्या प्रश्नांना ठाकरे उत्तरे देत होते. विरोधी विचारधारा असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससारख्या पक्षांसोबत आघाडी करत सरकार स्थापन करण्यावर भारतीय जनता पक्ष सतत टीका करत आहे. यावर प्रतिक्रिया देताना ठाकरे म्हणाले की, केंद्रातील सरकारमध्ये अनेक पक्ष सहभागी आहेत. त्यांच्या विचारधारा एकच आहे का?… त्यात किती पक्ष आहेत?.. त्यांचे किती विचार आहेत?… नितीशकुमार आणि भाजपची विचारधारा एक आहे का? मेहबुबा मुफ्ती आणि त्यांची विचारधारा एक होती का? जॉर्ज फर्नांडिस यांची विचारधारा एक होती का?, रामविलास पासवान आज त्यांच्यासोबत आहेत. त्यांची आणि भाजपची विचारधारा एक आहे का? आता झारखंडमध्ये काय घडलं? तिथं विचारधारा जुळली का? असे मुद्दे मांडत सगळं कसं आहे, झालं गेलं गंगेला मिळालं असं म्हणायचं. आपण घरात गंगाजल आणून ठेवतो तसंच… अशा शब्दांत ठाकरे यांनी भाजपला टोल्यांवर टोले हाणले आहेत.