नवी दिल्ली – केंद्र सरकारनं सादर केलेला अर्थसंकल्प आणि भारतीय अर्थव्यवस्थेच्या सद्यस्थितीवरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य केलं आहे. राहुल यांनी पंतप्रधान मोदींचा योग करतानाचा एक व्हिडिओ ट्विटरवर पोस्ट केला आहे. ‘तुम्ही कसरती सुरूच ठेवा. काय सांगावं,असा सणसणीत टोला लगावला आहे.
राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींचा एक व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून राहुल यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे. मोदी हे या व्हिडिओमध्ये योग करताना दिसत आहेत. त्यावर ‘प्रिय पंतप्रधानजी, कृपया आपल्या जादुई कसरती सुरूच ठेवा, तुम्हाला ठाऊक नाही, काय माहीत यामुळं अर्थव्यवस्था चांगल्या स्थितीत येईल,’ असा टोला राहुल यांनी लगावला आहे.
याआधी राहुल गांधी यांनी अर्थसंकल्पावरून मोदी सरकारवर हल्लाबोल केला होता. सरकारनं शेतकऱ्यांचा अपमान केला, असा आरोप त्यांनी केला होता. सरकार एकीकडे श्रीमंतांचे हजारो कोटींचे कर्ज माफ करत आहे आणि दुसरीकडे शेतकऱ्यांना दिवसाला फक्त १७ रुपये देत आहे. हा त्यांचा अपमान आहे, असं राहुल म्हणाले होते. मोदी सरकार रोजगाराच्या मुद्द्यावरही पुरते अपयशी ठरले आहे, असंही ते म्हणाले होते.