जळगाव :- जिल्ह्यातील बहुतांश ठिकाणी पावसाने दुसऱ्या दिवशीही हजेरी लावली. या वादळी पावसामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली आहेत.
जून संपत आला तरी पावसाने हजेरी लावलेली नव्हती, त्यामुळे शेतकरी चिंतेत सापडला होता. दरम्यान, या पावसामुळे कापूस उत्पादक शेतकरी सुखावले आहेत. काहींनी आधीच धूळ पेरणी केली होती. त्यात पाऊस उशिरा का होईना पण दमदार आल्याने शेतकरी सुखावला आहे.
धानोऱ्यात अडीच तास पाऊस
धानोरा | चोपडा तालुक्यातील धानोरा येथे २७ रोजी सायंकाळी ६ वाजेला जोरदार वादळासह पावसाचे आगमन झाले. गावात गुरुवारी भरलेल्या आठवडे बाजारात पहिल्याच पावसाने चांगलीच दाणादाण उडाली. गेल्या अनेक दिवसांपासून हुलकावणी दिलेल्या पावसाने गुरुवारी आगमन करत शेतीत मशागत करणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे. तसेच बागायती कापसाला सुद्धा पावसामुळे जीवदान मिळाले आहे. धानोऱ्यात सध्या लोकसहभागातून नाला खोलीकरण केले जात असून या पावसामुळे खड्यात पाणी भरण्यास सुरुवात झाली आहे. पावसामुळे पेरण्यांना सुरूवात झाली अाहे.
अडावद भागात वादळी पाऊस
अडावद | गुरुवारी सायंकाळी ७.४० वाजता अडावदसह परिसरात अनेक ठिकाणी ढगांचा गडगडाट आणि वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावली. धडकी भरवणारा विजांचा कडकडाट आणि विजेचा लंपडाव यामुळे शहरवासीयांचे जनजीवन विस्कळीत झाले हाेते. मात्र, कोणतीही जीवितहानी झाली नाही. सायंकाळी ६ वाजेपासून ढगाळ वातावरण हाेते. रात्री ८ वाजेच्या सुमारास जोरदार सरी बरसण्यास सुरुवात झाली. थोड्या-थोड्या वेळाने बरसणाऱ्या या सरींनी चांगलेच झोडपून काढले. रात्री उशिरापर्यंत परिसरात पाऊस सुरुच होता. दरम्यान, पावसाने नागरिकांना घरांमध्ये कैद केले असताना महावितरणनेही विजेच्या लपंडावाद्वारे त्यांना शॉक दिला.
पाडळसरेत वृक्ष उन्मळून पडलीे
पाडळसरे | पाडळसरे परिसरातील निम, बोहरे, कळमसरे, कलाली या भागात २७ रोजी सायंकाळी ६ वाजता जोरदार वादळी वाऱ्यासह जवळपास ५५ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली. या वादळी पावसामुळे पाडळसरे ते निम या रस्त्यावरील अनेक मोठी वृक्ष उन्मळून पडली तर अनेक शेतकऱ्यांचे शेती बांध फोडून काळी कसदार व गाळाची शेती खरवडून निघाली हाेती. शेतकरी बांधवांना उन्मळून पडलेल्या वृक्षांना तोडून जागा मोकळी करावी लागली.