नवी दिल्ली – सरकारी आणि सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमधील सरळसेवा भरती प्रक्रिया आणखी सुलभ करण्यात येणार आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात यासंबंधी मोठी घोषणा केली. परीक्षार्थींना अनेक टप्प्यांत परीक्षा द्यावी लागते, त्याऐवजी एकच ऑनलाइन परीक्षा द्यावी लागणार आहे. प्रत्येक जिल्ह्यात परीक्षा केंद्रे स्थापन करण्यात येतील. त्यासाठी एक एजन्सी स्थापन करण्यात येणार आहे, असं सीतारामन यांनी सांगितलं.
सरकारी आणि सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये नॉन-गॅझेटेड पोस्ट भरतीसाठीच्या धोरणात बदल करण्यात येणार आहे. सद्यस्थितीत अनेक टप्प्यांत परीक्षा घेतल्या जात आहेत. आता नॅशनल रिक्रुटमेंट एजन्सी (एनआरए) स्थापन करण्याचे प्रस्तावित आहे. सरळसेवा भरतीसाठी ऑनलाइन समान पात्रता परीक्षा घेण्यात येईल, अशी माहिती अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली. या पदांवरील भरतीसाठी प्रत्येक जिल्ह्यात परीक्षा केंद्रे सुरू करण्यात येतील. देशातील ११२ जिल्ह्यांना प्राधान्य देण्यात येईल, असंही त्या म्हणाल्या.